Arvind Kejriwal : माझा जीव गेला तरी दु:ख करू नका, माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या; केजरीवाल झाले भावूक
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Arvind Kejriwal : माझा जीव गेला तरी दु:ख करू नका, माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या; केजरीवाल झाले भावूक

Arvind Kejriwal : माझा जीव गेला तरी दु:ख करू नका, माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या; केजरीवाल झाले भावूक

May 31, 2024 01:15 PM IST

arvind kejriwal appeal to delhiites : अतंरिम जामिनाची मुदत संपत आल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांना भावनिक आवाहन केलं आहे.

माझा जीव गेला तरी दु:ख करू नका, माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या; केजरीवाल झाले भावूक
माझा जीव गेला तरी दु:ख करू नका, माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या; केजरीवाल झाले भावूक

arvind kejriwal : दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात आरोपी असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे रविवारी पुन्हा तुरुंगात जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला भावनिक आवाहन केलं आहे. देश वाचवण्यासाठी मला जीव द्यावा लागला तरी कुणी वाईट वाटून घेऊ नका. माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे.

निवडणूक प्रचारासाठी अंतरिम जामीन दिल्याबद्दल केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. न्यायालयानं दिलेली मुदत आता संपत आहे. मी पुन्हा तिहार तुरुंगात जात आहे. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जात आहे याचा मला अभिमान आहे. हे सरकार मला आणखी किती दिवस तुरुंगात ठेवेल माहीत नाही. पण माझा विचार पक्का आहे. ते मला गप्प बसवू शकत नाहीत. मला देश वाचवण्यासाठी प्राणाची आहुती द्यावी लागली तरी लोकांनी दु:ख करू नये, असंही ते म्हणाले.

'तुरुंगात असताना त्यांनी अनेक दिवस माझं इन्सुलिनचं इंजेक्शन बंद केलं. माझ्या रक्तातील साखर वाढली. तुरुंगात ५० दिवस होतो. या काळात माझं वजन ६ किलोनी कमी झालं. बाहेर आल्यानंतरही ते वाढलं नाही. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कदाचित हे एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण असावं. यावेळी तुरुंगात माझा आणखी छळ केला जाण्याची शक्यता आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. 

दिल्ली सरकारची सर्व काम सुरू राहणार

केजरीवाल जेलमध्ये असेल किंवा बाहेर, दिल्लीची कुठलीही कामं थांबणार नाहीत. मोफत वीज, मोहल्ला क्लिनिक, हॉस्पिटल, मोफत औषधं सगळं काही सुरू राहील. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गरीब महिलांना महिन्याला १ हजार रुपये देण्याची योजना सुरू करणार, असंही केजरीवाल म्हणाले.

माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या!

‘मी नेहमी दिल्लीकरांचा एक मुलगा म्हणून काम केलं आहे. आज मी माझ्या कुटुंबासाठी काही मागतो आहे. माझे आई-वडील वयस्कर आहेत. ते आजारी असतात. मी नसताना माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ते चांगले राहतील. माझ्या पत्नीनंही प्रत्येक कठीण काळात माझी साथ दिली आहे. ती मनानं खूप मजबूत आहे. दिल्लीकरांनीही कठीण काळात माझी साथ दिली आहे. यापुढं देखील तुमचा आशीर्वाद मला हिंमत वाढवत राहील. देवाच्या कृपेनं लवकरच परत येईन,’ असा विश्वासही केजरीवाल यांनी व्यक्त केला.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर