अरविंद केजरीवाल यांची भाजपवर कुरघोडी! हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना दरमहा १८ हजार रुपये देण्याची घोषणा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अरविंद केजरीवाल यांची भाजपवर कुरघोडी! हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना दरमहा १८ हजार रुपये देण्याची घोषणा

अरविंद केजरीवाल यांची भाजपवर कुरघोडी! हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना दरमहा १८ हजार रुपये देण्याची घोषणा

Dec 30, 2024 02:18 PM IST

Pujari Granthi Samman Yojana: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत हिंदू पुजारी आणि शीख धर्मातील ग्रंथींना दरमहा १८ हजार रुपये मिळणार आहेत.

 केजरीवाल सरकार हिंदू पुजारी आणि शीख ग्रंथींना दरमहा १८ ००० रुपये देणार!
केजरीवाल सरकार हिंदू पुजारी आणि शीख ग्रंथींना दरमहा १८ ००० रुपये देणार! (PTI file photo)

Arvind Kejriwal News: बेरोजगार महिलांना मासिक मानधन देण्याच्या योजनेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर 'आप'चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पुजारी ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत केजरीवाल सरकार हिंदू आणि शीख पुजाऱ्यांना दरमहा १८,००० रुपये मानधन दिले जाणार आहे. या योजनेसाठी नोंदणी मंगळवारपासून सुरू होईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

नुकतीच अरविंद केजरीवाल यांची दिल्लीत पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते म्हणाले की, ‘आज मी एका योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा करत आहे. पुजारी ग्रंथी सन्मान योजना असे या योजनेचे नाव आहे. याअंतर्गत मंदिरांचे पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथींना मानधन देण्याची तरतूद आहे. त्यांना दरमहा सुमारे १८ हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. देशात पहिल्यांदाच असे घडत आहे. पुरोहित हा पिढ्यानपिढ्या संस्कार पुढे नेणारा वर्ग आहे. त्यांनी कधीही आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही आणि आम्ही त्यांच्याकडे कधीच लक्ष दिले नाही’, असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उद्यापासून नोंदणीला सुरुवात

दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिराला भेट दिल्यानंतर या योजनेचा शुभारंभ करणार असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. या योजनेसाठी उद्यापासून नोंदणी सुरू होणार आहे. या योजनेची नोंदणी सुरू करण्यासाठी मी उद्या कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाणार आहे.

महिला सन्मान योजनेवरून वाद सुरू

या महिन्याच्या सुरुवातीला केजरीवाल यांनी महिला सन्मान योजना सुरू केली, ज्यात बेरोजगार महिलांना दरमहा २१०० रुपये विद्यावेतन दिले जाते. 'आप'च्या नेत्यांनी या योजनेसाठी नोंदणी मोहीमही सुरू केली. मात्र, दुसऱ्याच दिवशी सरकारच्या महिला व बालविकास विभागाने 'महिला सन्मान' योजना अस्तित्वात नसल्याची जाहिरात केली आणि नागरिकांना वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले.

राज्यपालांकडून चौकशीचे आदेश

आम आदमी पक्षाने या घोटाळ्यात सहभागी अधिकारी भाजपच्या दबावाखाली असल्याचा दावा केला. त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे. दुसरीकडे, भाजपने फसवणुकीचा आरोप केला असून आप आणि दिल्ली सरकार एकमत नसल्याचा दावा केला आहे. दिल्लीतील सत्ताधारी 'आप'च्या प्रस्तावित योजनेसाठी नावनोंदणीच्या नावाखाली महिलांची वैयक्तिक माहिती गोळा करणाऱ्या खासगी व्यक्तींच्या चौकशीचे आदेश दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी दिले.

महिला सन्मान योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक?

काँग्रेस नेते आणि पक्षाचे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संदीप दीक्षित यांच्या तक्रारीच्या आधारे सक्सेना यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. महिला सन्मान योजनेच्या नावाखाली महिलांची वैयक्तिक माहिती गोळा करणाऱ्या शिबिरांची ओळख पटविण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अनेक पथके तयार केली आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर