Amroha Uttar Pradesh Crime Incident : दुचाकीवरून जात असलेल्या लष्करी जवानाला मोकाट बैलाने जोरदार घडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत सैन्यातील जवानाचा मृत्यू झाला असून त्याची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी गावात ही संतापजनक घटना घडली असून जवानाच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता अमरोहातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. मृत लष्करी जवान हसनपूर-अटरसी मार्गावर दुचाकीवरून जात असताना ही दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये लष्करी सेवेत असलेले जवान अंकित कुमार हे काही दिवसांच्या सुट्टीवर घरी आले होते. त्यानंतर एका मित्राच्या लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी ते पत्नी आणि मुलांसह दुचाकीवर हसनपूर-अटरसी मार्गावरून जात असताना अचानक एका मोकाट बैलाने त्यांना जोराची धडक दिली. त्यात अंकित कुमार यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. अंकित कुमार यांची पत्नी आणि मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मोकाट बैलाच्या धडकेत जवानाचा मृत्यू झाल्याची घटना समजताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर मोकाट बैलाला जेरबंद करण्यात अधिकारी आणि पोलिसांना यश आलं असून बैलाची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मोकाट जनावरांचा प्रश्न चांगलाच गाजला होता. त्यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोशाळेंची संख्या वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु आता मोकाट जनावरामुळं लष्करातील जवानाचा मृत्यू झाल्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या