Anupam Kher on Fake Currency: महात्मा गांधींऐवजी अनुपम खेर यांचा फोटो असलेल्या ५०० रुपयांच्या नोटेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अहमदाबादमधील एका सराफा कंपनीच्या मालकाची १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या व्हिडिओबाबत अहमदाबाद पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सोने-चांदी व्यावसायिक मेहुल ठक्कर यांना २३ सप्टेंबर रोजी त्यांच्या ओळखीच्या लक्ष्मी ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाचा फोन आला. त्याने मेहुल ठक्कर यांना २ किलो १०० ग्रॅम सोने घ्यायचे आहे, असे सांगितले आणि त्याची किंमत विचारली. मेहुल हा लक्ष्मी ज्वेलर्ससोबत १५ वर्षांहून अधिक काळ व्यवसाय करत आहे. त्यामुळे मेहुलने त्याच्यावर विश्वास ठेवत १.६० कोटींचा करार केला. सोने खरेदी करणाऱ्या दोघांनी सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून सेक्युरिटी डिपॉझिट म्हणून १.३ कोटी रुपयांच्या नोटा जमा केल्या आणि उर्वरित रक्कम कुरिअरने पाठवून देतो, असे सांगितले. मात्र, सोने दिल्यानंतर मेहुलच्या कर्मचाऱ्यांनी नोटा चेक केल्या असता त्या बनावट असल्याचे आढळले.
या प्रकरणी नवरंगपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्पेक्टर ए. ए. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कंपनीची फसवणूक करण्याचा संपूर्ण प्लॅन तयार केला होता. कुरिअरची कंपनीही बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नोटांवर महात्मा गांधीऐवजी अनुपम खेर यांचा फोटो दिसत आहे. तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे स्पेलिंगही चुकीचे आहे. नोटांवर एसबीआयस्टॅम्प असलेली स्लिपही दिसत आहे, ज्यात स्टेट बँक ऑफ इंडिया चुकीच्या पद्धतीने लिहिले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाऐवजी 'मनोरंजन बँक ऑफ इंडिया' असे लिहिले आहे. पहिल्यांदाच अशा बनावट नोटा समोर आल्या आहेत.
अनुपम खेर यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, 'बघा! पाचशे रुपयांच्या नोटांवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो? काहीही होऊ शकते!' अनुपम खेर यांची ही पोस्ट पाहून अनेकजण आश्चर्यचकीत झाले आहेत.
२२ सप्टेंबर रोजी सुरत पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.