केरळमधील नर्सिंग होममधील रॅगिंगच्या वृत्तामुळे संताप व्यक्त होत असतानाच रॅगिंगची आणखी एक भयानक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कन्नूर मध्ये अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा रॅगिंगमुळे हात मोडला आहे. आदर न दाखवल्याचा ठपका ठेवत सिनिअर विद्यार्थ्यांनी त्याला बेदम मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. विद्यार्थ्याच्या आरोपानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. कोलावल्लूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलावल्लूर पीआर मेमोरियल स्कूलचा विद्यार्थी मोहम्मद निहाल याने सांगितले की, वरिष्ठांच्या मारहाणीमुळे त्याचा हात तुटला होता. पीडिताला थॅलेसेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
असाच एक प्रकार काही दिवसापूर्वी कोट्टायममधील नर्सिंग कॉलेजमध्ये समोर आला होता. या घटनेत पाच विद्यार्थ्यांना अटक केली आहे. या विद्यार्थ्यांवर प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रॅगिंगशी संबंधित एक हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्याच्या प्रायव्हेट पार्टवर जड वस्तू लटकवून हसताना आणि अश्लिल कमेंट करताना दिसत आहेत. त्यांनी विद्यार्थ्याला कंपासने ही मारहाण केली आहे.
या पाच विद्यार्थ्यांना गुरुवारी अटक करण्यात आली. सुमारे तीन महिन्यांपासून रॅगिंग सुरू असल्याचा आरोप कनिष्ठ विद्यार्थ्यांनी केला आहे. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आल्याचे कॉलेजकडून सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत पोलिसांकडून १० दिवसांत अहवाल मागवला आहे.
संबंधित बातम्या