Earthquake Turkey: तुर्कीत पुन्हा ७.६ तिव्रतेच्या भूकंपामुळं हाहाकार; आतापर्यंत १३०० लोकांचा मृत्यू!
Earthquake In Turkey Today : तुर्कीसह सीरिया आणि इरामध्ये पुन्हा मोठा भूकंप झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Turkey Earthquake Live Updates : आशिया आणि युरोपचं प्रवेशद्वार असलेल्या तुर्कीमध्ये आज सकाळपासून भूकंपाचे जोरदार धक्के बसत आहे. सकाळी झालेल्या भूकंपात २०० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. परंतु आता आज दुपारी तुर्कीसह इराण आणि सीरिया पुन्हा ७.६ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळं तुर्कीतील भूकंपात आतापर्यंत १३०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ठराविक वेळात होणाऱ्या भूकंपामुळं तुर्कीसह शेजारी देशांमधी नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून चोहीकडे मृतांचा खच पडल्यानंतर प्रशासनानं मदत आणि बचावकार्य सुरू केलं आहे. भूकंपाच्या भीतीनं नागरिकांनी घर सोडून मोकळ्या मैदानात धाव घेतली आहे. त्यानंतर आता जगभरातील देशांनी तुर्कीतील भूकंपाबाबत शोक व्यक्त करत मदतीसाठी विमानं पाठवली आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
भूकंपाच्या भीषण संकटाचा सामना करणाऱ्या तुर्की आणि सीरियाला मदत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आली आहे. त्यात तुर्की, सीरिया आणि इराणमधील भूकंपग्रस्तांची मदत आणि बचाव मोहिमेत मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या दोन टीम भारतातून रवाना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफच्या या टीममध्ये १०० हून अधिक भारतीय जवानांना समावेश असणार आहे. याशिवाय रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनीदेखील तिन्ही भूकंपग्रस्त देशांमध्ये मदतीसाठी जवानांनी तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तीव्र भूकंपामुळे प्रभावित झालेल्या भागात पोहोचण्यासाठी तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानं एक हवाई कॉरिडॉर तयार केला आहे. भूकंपग्रस्त भागात वैद्यकीय पथकं, आवश्यक साहित्य, जेवण आणि पाणी पोहचवण्यासाठी युद्धपातळीवर व्यवस्था केली जात आहे.
गझियानटेप शहर भूकंपाचा केंद्रबिंदू...
तुर्कीतील भूकंपाचा केंद्रबिंदू हे गझियानटेप शहर आहे. गझियानटेप शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर भूकंपामुळं जास्त वित्त आणि जीवीतहानी झालेली आहे. इस्तांबूल, दमास्कस, अलेप्पो, हमा आणि लताकिया या शहरांमधील अनेक ठिकाणी मोठ-मोठ्या इमारती भूकंपामुळं कोसळल्याचं वृत्त आहे. गझियानटेप शहरापासून ३० किमी अंतरावर पहाटे ४.१७ च्या सुमारास पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर ११ मिनिटांनी पुन्हा मोठा भूकंप झाला. त्यानंतर १९ मिनिटांनी तिसरा भूकंप झाला. त्यानंतर आता दुपारी ७.६ रिश्टर स्केलचा पुन्हा मोठा भूकंप झाल्यामुळं अनेकांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तुर्की, सीरिया आणि इराणच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवस भूकंपाचे हादरे जाणवणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.