Salman Khan News: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील येथील निवासस्थानाबाहेर दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी रविवारी पहाटे गोळीबार केला. याप्रकरणी मुबंई पोलिसाच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला असता सोशल मीडियावर या घटनेशी संबंधित फेसबूक पोस्ट व्हायरल होत आहे. अनमोल बिश्नोई या नावाने व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली. पोलीस आता या व्हायरल पोस्टचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फेसूबकमध्ये असे म्हटले आहे की, "सलमान खान, तुला आमची ताकद दाखवायची होती. त्यासाठीच हा हल्ला होता. तुझ्यासाठी हा शेवटचा इशारा आहे. यानंतर मोकळ्या घरावर गोळ्या झाडल्या जाणार नाहीत. ज्या दाऊद आणि छोटा शकीलला तू देव मानतोस, त्यांच्या नावांची आम्ही दोन कुत्री पाळली आहेत. मला जास्त बोलण्याची सवय नाही. जय श्री राम. जय भारत." गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणे आणि सलमान खानला धमकावणे, असा या पोस्टमागचा उद्देश दिसत आहे.
अनमोल बिश्नोई हा बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनमोल बिश्नोई सध्या कॅलिफोर्नियामध्ये आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्येनंतर अनमोल भारतातून पळून गेला. तपासदरम्यान तो अझरबैजान येथे असल्याची माहिती मिळाली. मात्र, तो तिथूनही पळून जाण्यात यशस्वी ठरला.केंद्रीय गृहखात्याने तयार केलेल्या गँगस्टर्सच्या यादीत अनमोल बिश्नोई उर्फ भानू याच्या नावाचा समावेश करण्यात आला. एनआयएने त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले. सध्या तो अमेरिकेत लपून बसला आहे, असे सांगितले जात आहे.
१९९८ मध्ये सलमान खानच्या 'हम साथ साथ है' या चित्रपटाची राजस्थानमध्ये शूटींग सुरू होती. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळवीटची शिकार केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला. त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली होती. परंतु, नंतर त्याला जामीन मंजूर झाली. बिश्नोई समाजात काळवीटला पवित्र मानले जाते. यामुळे सलमान खान लॉरेन्स बिश्नोईच्या रडारवर होता. बिश्नोईची गँग सातत्याने चर्चेत राहण्यासाठी हाय प्राफोईल लोकांना लक्ष्य करते, असे तपास यंत्रणांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या