MP Crime News : नवऱ्याने टोमॅटो खाल्ल्याने पत्नीने घर सोडलं; पोलिसांच्या हस्तक्षेपाने तरुणाचा संसार वाचला
MP Crime News : नवऱ्याने दोन टोमॅटो खाल्ल्याच्या रागातून महिलेने घर सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Madhya Pradesh Crime News Marathi : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहे. टोमॅटोच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाल्याने अनेकांनी स्वयंपाकात टोमॅटो वापरणंच बंद केलं आहे. देशातील अनेक शहरांमध्ये ११० ते १५० रुपयांपर्यंत टोमॅटोचा भाव पोहचला आहे. त्यातच आता टोमॅटोवरून पती-पत्नीत मोठा वाद झाल्याची घटना समोर आली आहे. नवऱ्याने स्वयंपाकात दोन टोमॅटो वापरल्याच्या रागातून त्याची पत्नी मुलांसह घर सोडून निघून गेली आहे. मध्यप्रदेशातील शहडोलमध्ये ही घटना घडली असून अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर तरुणाला संसार वाचला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील शहडोल येथे राहणाऱ्या संदीप बर्मन यांनी दोन दिवसांपूर्वी घरात केलेल्या स्वयंपाकात दोन टोमॅटो वापरले होते. याची माहिती संदीपची पत्नी आरतीला समजली. त्यानंतर संतापलेल्या आरतीने थेट नवऱ्यालाच शिवीगाळ करायला सुरुवात केली. दोघांमध्ये टोमॅटो खाण्यावरून वाद झाल्याने आरतीने थेट लेकीला कडेवर घेत घर सोडलं. त्यानंतर संदीपने हातातलं काम सोडून पत्नीला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला, परंतु ती काही सापडली नाही. अखेर संदीपने पत्नीला शोधण्यासाठी थेट पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता असलेल्या आरतीला शोधण्याची कार्यवाही सुरू केली.
नवऱ्याशी भांडण करून फरार झालेल्या आरतीला शहडोल पोलिसांनी शोधण्यास सुरुवात केली. यावेळी आरती मुलीसह तिच्या बहिणीकडे गेल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी आरतीशी संपर्क साधत तिला थेट पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. पोलिसांनी संदीप आणि आरती या दाम्पत्यातील वादात हस्तक्षेप करत दोघांची समजूत काढली. त्यानंतर संदीपनेही आरतीची माफी मागत चूक झाल्याचं मान्य केलं. त्यानंतर दोघांमधील वाद संपला असून आरती संदीपच्या घरी जाण्यास तयार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.