मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आंध्र प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींची बहीण काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

आंध्र प्रदेशमध्ये राजकीय हालचालींना वेग, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींची बहीण काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 02, 2024 03:45 PM IST

Y S Sharmila will Join Congress : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यामुळे आंध्रात काँग्रेसला संजीवनी मिळू शकते.

CM jagan mohan reddy sister to join congress
CM jagan mohan reddy sister to join congress

वायएसआर तेलंगाणा पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांची बहीण वायएस शर्मिला या आठवड्यात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. राजकीय सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे. काँग्रेसने तेलंगणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून भारत राष्ट्र समितीचे राज्यातील वर्चस्व संपुष्टात आणले. त्यामुळे तेलंगाणा काँग्रेसमध्ये महत्वपूर्ण बदल होऊ शकतात.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पुढली वर्षी होणाऱ्या लोकसभा तसेच आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस शर्मिला यांना मोठी जबाबदारी देऊ शकते. यामुळे आंध्र प्रदेशमध्ये काँग्रेस पुनर्जीवित होऊ शकते. वायएसआरसीपी सोडण्यास अनेक इच्छुक आता काँग्रेसमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आपला प्रभाव पाडण्यात अयशस्वी ठरत आहे.

जगन मोहन रेड्डी यांच्याशी राजकीय मतभेद झाल्यानंतर वायएस शर्मिला यांनी जुलै २०२१ मध्ये वायएसआर तेलंगणा पक्षाची स्थापना केली होती. मात्र शर्मिला यांच्या पक्षाने नुकतीच झालेली तेलंगणा विधानसभा निवडणूक न लढवता काँग्रेसला मदत केली होती. यामुळे मतविभाजन टळून याचा काँग्रेसला फायदा झाला होता.

वायएस शर्मिला यांची काँग्रेससोबतची वाढती जवळीक चर्चेचा विषय ठरली होती आणि त्या लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब होणार असून वायएस शर्मिला या आठवड्यात काँग्रेसमध्ये प्रवेश करत आपला पक्षही विलीन करणार आहेत. वायएस शर्मिला यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीसह आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीतही चांगला फायदा होऊ शकतो.

WhatsApp channel