Sister Murdered her Two Brother for money: आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्ह्यात एका २८ वर्षीय तरुणीने वडिलांच्या मृत्यूनंतर मिळालेले पेन्शनची रक्कम लाटण्यासाठी आपल्या दोन भावांची हत्या केली. नेकरीकल्लू गावातील रहिवासी कृष्णावेणी असे खून करणाऱ्या आरोपी बहिणीचे नाव आहे. तर या घटनेत तिने आपला मोठा भाऊ गोपी कृष्ण (वय ३२) आणि धाकटा भाऊ रामकृष्ण (वय २६) यांची हत्या केली. तिने त्यांना आधी गुंगीचे औषध दिले. यानंतर त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली.
आरोपी व हत्या झालेल्यांचे वडील पालीराजू हे शिक्षक होते. त्यांचे जानेवारी महिन्यात अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पेन्शनचे सरकारकडून ४० लाख रुपये मिळाले. ही रक्कम दोन्ही भाऊ हडप करतील या भीतीने तिने दोघा भवांची हत्या केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी बहिणीला अटक केली असून तिने भावांच्या हत्येची कबुली दिली आहे.
पलनाडू जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. श्रीनिवास राव यांनी या हत्याकांडाची माहिती दिली आहे. ते म्हणाले, "आरोपी कृष्णवेणीयांना भीती होती की त्यांचे दोन्ही भाऊ त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर मिळालेले पैसे हडप करतील. पेन्शन, घर आणि जमिनी आपल्या नावावर करून तिला काहीही देणार नाही असे आरोपी बहिणीला वाटले. यामुळे तिने संपूर्ण रकमेवर आपला हक्क असल्याचा दावा कृष्णवेणी यांनी केला. वडिलांच्या आजारपणाच्या काळात तिने वडिलांची जास्त काळजी घेतली असा दावा आरोपी बहिणीने केला होता. मात्र दोन्ही भावांनी देखील वडिलांच्या संपत्तीवर दावा दाखल केला होता. वारशात योग्य वाटा मिळाला पाहिजे, असा दम त्यांनी बहिणीला दिला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णवेणीने २६ नोव्हेंबर रोजी आपल्या लहान भावाची हत्या केली होती. त्यानंतर १० डिसेंबर रोजी तिने दुसऱ्या मोठ्या भावाची हत्या केली. या घटनांदरम्यान तिने आधी भावाला गुंगीचे औषध दिले. यानंतर तिने चुलत भावांच्या मदतीने ओढणीने मोठ्या भावाचा गळा आवळून त्याचा खून केला. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो कालव्यात फेकून दिला. मोठा भाऊ हा पोलिस होता. पोलिस कॉन्स्टेबल गोपी कृष्णा ड्युटीवर हजर न झाल्याने त्याचा खुनाचा उलगडा झाला. आरोपी बहिणीने तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास केला असता वडिलांच्या मालमत्तेवरून आणि पेन्शनवरून भावंडांमध्ये भांडण होत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी बहिणीला अटक केल्यावर तिने खुनाची कबुली दिली.
संबंधित बातम्या