मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  YSR News : तांत्रिक बिघाडानंतर विमानाची एमर्जन्सी लँडिंग; आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बालंबाल बचावले

YSR News : तांत्रिक बिघाडानंतर विमानाची एमर्जन्सी लँडिंग; आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बालंबाल बचावले

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 30, 2023 09:39 PM IST

Plane Emergency Landing : आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन उड्डाण केलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.

Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy
Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy (HT)

Andhra Pradesh CM Jagan Mohan Reddy : आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना घेऊन दिल्लीसाठी निघालेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर पायलटनं प्रसंगावधान राखल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. विमानात बिघाड झाल्याचं समजताच पायलटनं गन्नावरम विमानतळावर तातडीनं एमर्जन्सी लँडिंग केलं असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी सुखरूप असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वीच नेपाळमध्ये भीषण विमान अपघाताची घटना समोर आलेली असतानाच आता मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विमानात बिघाडाची घटना समोर आल्यामुळं देशभरात खळबळ उडाली आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यासह काही अधिकाऱ्यांचं पथक विशेष विमानानं सायंकाळी पाच वाजता दिल्लीसाठी निघालं होतं. परंतु उड्डाण केल्याच्या काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यानंतर पायलटनं एअर ट्रॅफिक कंट्रोलला याबाबतची माहिती देत विमान तातडीनं विजयवाड्यातील विमानतळावर उतरवलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री रेड्डी हे त्यांच्या ताडेपल्ली या निवासस्थानी दाखल झाले असून त्यांच्या दिल्ली दौऱ्यासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था केली जात असल्याची माहिती आहे.

वडिलांचं हेलिकॉप्टर अपघातात झालं होतं निधन...

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे वडील आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते किरण कुमार रेड्डी हे मुख्यमंत्रीपदावर असताना एका हेलिकॉप्टर अपघातात त्यांचं निधन झालं होतं. त्यामुळं अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्दैवी घटनेची आठवण आंध्रप्रदेशातील लोकांना होत आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात येताच पायलटनं एमर्जन्सी लँडिंग केल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे.

IPL_Entry_Point