लोन अॅपवरून कर्ज घेणे आंध्र प्रदेशातील एका तरुणाच्या चांगलच अंगलट आलं आहे. कर्जदार तरुणाच्या पत्नीचे मॉर्फ केलेला फोटो व्हायरल झाल्याने पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरुणाने एका अॅपवरून दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. वसुलीसाठी लोन एजंट त्याला त्रास देत होता. याच एजंटने तरुणाच्या पत्नीचा फोटो मॉर्फ करून मित्रांना पाठवला. यामुळे तरुण इतका वैतागला की त्याने आत्महत्या केली.
अलीकडच्या काळात अॅपवरून कर्ज देणाऱ्यांकडून होणाऱ्या छळाच्या घटनांमध्ये खूप वाढ झाली आहे. अनेक प्रकरणांमध्ये लोकांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे.
२५ वर्षीय नरेंद्र याचा सहा महिन्यापूर्वी अखिलासोबत प्रेम विवाह झाला होता. दोघेही विशाखापट्टणम येथे राहत होते आणि नरेंद्र तेथे मच्छीमार म्हणून काम करत होता. खराब हवामानामुळे तो काही दिवस मासेमारीला जाऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिघडली. घरात पैसे नसल्याने खर्च भागविण्यासाठी त्याने मोबाइल अॅपवरून दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
काही आठवड्यांतच लोन अॅप एजंटने कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच तो तरुणाला शिवीगाळ करणारे मेसेजही पाठवत असे. इतकंच नाही तर एजंटने नरेंद्रच्या पत्नीचा मॉर्फ केलेला फोटो त्याच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना पाठवला. या फोटोवर प्राइस टॅग होता. जेव्हा अखिलाला हा फोटो मिळाला तेव्हा तिने पती नरेंद्रला ही गोष्ट सांगितली. यानंतर अखिलाला या कर्जाची माहिती मिळाली. मग दोघांनी मिळून संपूर्ण रक्कम भरण्याचा निर्णय घेतला.
पण त्यानंतरही एजंटकडून होणारा त्रास थांबला नाही. लोकांनी नरेंद्रला फोन करून त्याच्या पत्नीच्या व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत विचारायला सुरुवात केली. वैतागून त्याने मंगळवारी आपले जीवन संपवले. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच सुखी संसाराचा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आंध्र प्रदेशात लोन एजंटच्या छळाची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी नंद्याल जिल्ह्यात एका लोन अॅप एजंटने एका तरुणीचा छळ केला होता. त्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला वाचवले. त्याचबरोबर गुंटूरमध्येही असेच घडले होते. यावर आळा घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
संबंधित बातम्या