उद्योगपती अनंत अंबानी यांच्या ‘वनतारा’ या प्राणी पुनर्वसन केंद्राला नुकताच केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट ‘प्राणी मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. भारतात वन्य प्राण्यांची देखभाल, कल्याण या क्षेत्रात हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. भारतातील 'कॉर्पोरेट' श्रेणी अंतर्गत ‘वनतारा’च्या राधे कृष्णा मंदिर प्राणी कल्याण ट्रस्टद्वारे हस्तींचे बचावकार्य, संरक्षण, उपचार तसेच त्यांची आजीवन काळजी घेतल्याबद्दल असाधारण योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात आला. या केंद्रातर्फे आत्तापर्यंत २४० हून हत्तींची सुटका करण्यात आली असून त्यांना साखळी-मुक्त करून, सुरक्षित आणि समृद्ध वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये ३० सर्कशीतील हत्ती, वृक्षतोड उद्योगात ओंडके वाहून नेण्यासाठी वापरले जाणारे १०० हत्ती तसेच राइड्स आणि रस्त्यावर भीक मागण्यासाठी वापर करून वर्षानुवर्ष शोषण करण्यात येत असेलल्या हत्तींचा समावेश आहे.
‘वनतारा’ येथील हत्ती सुश्रूषा केंद्र हे जगातील अशाप्रकारचे सर्वात मोठे केंद्र असून येथे हत्तींसाठीचे सर्वात मोठे रुग्णालय बांधण्यात आले आहे. ‘वनतारा’ प्राणी पुनर्वसन केंद्रात जागतिक दर्जाचे पशुवैद्यकीय उपचार उपलब्ध करण्यात येत असून जखमी हत्तींची काळजी घेतली जाते. तसेच सुटका करण्यात आलेल्या हत्तींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिल अशाप्रकारचे वातावरण उपलब्ध करण्यात येते. ‘वनतारा’च्या प्राणी पुनर्वसन केंद्राच्या ९९८ एकर विस्तीर्ण नैसर्गिक जंगलात हत्ती मुक्तपणे वावरून चारा, माती आणि धुळीत स्नान करू शकतात. शिवाय नैसर्गिकरित्या तयार करण्यात आलेल्या तलावांमध्ये स्नान करू शकतात. येथे जखमी हत्तींचे रोग व्यवस्थापन आणि त्यांच्या वेदनाशमनासाठी अॅलोपॅथी, आयुर्वेदासह एक्यूपंक्चरसारख्या इतर पर्यायी औषधांसह प्रगत पशुवैद्यकीय काळजी घेतली जाते.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे एका समारंभात केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरम्यान, वनतारा प्राणी पुनर्वसन केंद्रात प्राण्यांची सेवा करणे हे केवळ कर्तव्य नसून तो धर्म आणि सेवा मानली जाते. ही एकप्रकारची बांधिलकी असून ती खोलवर रुजलेली आहे. केंद्र सरकारकडून मिळालेला ‘प्राणी मित्र’ पुरस्कार हा भारतात प्राण्यांचे संरक्षण आणि काळजी घेण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या अगणित व्यक्तींना समर्पित असल्याची प्रतिक्रिया वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान कराणी यांनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या