Amit shah reply to mallikarjun kharge : ‘नरेंद्र मोदी यांना हटवल्याशिवाय मी मरणार नाही,’ असं वक्तव्य करणारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टीका केली आहे. ‘खर्गे यांचं वक्तव्य द्वेष आणि भीतीचं प्रतीक आहे,’ असं शहा म्हणाले.
जम्मू-काश्मीर व हरयाणा विधानसभेच्या प्रचाराची सध्या धूम आहे. भाजप व काँग्रेससह स्थानिक पक्षांच्या नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हेही सभा घेत असून मोदी सरकारवर तोफा डागत आहेत. मात्र, रविवारी एका प्रचार सभेच्या वेळी गर्दीला संबोधित करताना खर्गे यांची तब्येत अचानक बिघडली. ते जवळपास बेशुद्ध झाले होते. तरीही सर्व ताकद एकवटून त्यांनी भाषण केलं व मोदींवर टीकेची झोड उठवली.
खर्गे यांच्या या वक्तव्यावर अमित शहा यांनी टीका केली आहे. ‘हे वक्तव्य आक्षेपार्ह आणि लज्जास्पद आहे. काल खर्गे यांनी बेताल बोलण्याच्या बाबतीत टोक गाठलं. या बाबतीत त्यांनी स्वत:सह त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनाही मागे टाकलं. स्वत:च्या प्रकृतीविषयी बोलताना त्यांनी कारण नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यात ओढलं, असं शहा म्हणाले. काँग्रेसवाल्यांना मोदींशिवाय काहीच दिसत नाही. या लोकांच्या मनात पंतप्रधान मोदींबद्दल किती द्वेष आणि भीती आहे हेच या वक्तव्यावरून दिसतं, असं अमित शहा म्हणाले.
'खर्गे यांच्या तब्येतीबद्दल मोदीजींना काळजी आहे. मीही त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतो आणि आम्ही सर्व प्रार्थना करतो की त्यांना दीर्घ, निरोगी आयुष्य लाभो. ते अनेक वर्षे जिवंत राहो आणि २०४७ पर्यंत विकसित भारताची निर्मिती पाहण्याचं भाग्य त्यांना लाभो, असा खोचक टोलाही शहा यांनी हाणला.
जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथील जाहीर सभेत भाषण करताना खर्गे यांची तब्येत बिघडली. त्यांनी काही काळ भाषण थांबवून पुन्हा बोलायला सुरुवात केली. 'माझं वय ८३ वर्षे आहे. मी इतक्या लवकर मरणार नाही. जोपर्यंत पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवत नाही तोपर्यंत मी जिवंत राहीन, असं खर्गे म्हणाले.
सभेनंतर खर्गे यांची कठुआ जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यांना मिर्गी आल्याचं निदान झालं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.