मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Amit Shah: '१९ वर्षे मोदींनी विष पचवले; दंगलीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी'

Amit Shah: '१९ वर्षे मोदींनी विष पचवले; दंगलीचे आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 25, 2022 11:20 AM IST

Amit Shah on Gujarat Riots: गुजरात दंगलीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआयला मुलाखत देत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Amit Shah
Amit Shah

Amit Shah reaction after Supreme Court verdict on Gujarat Riots: गुजरात दंगलीच्या प्रकरणात नरेंद्र मोदी यांच्यासह ६४ जणांना क्लीन चिट देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या दंगलीमागे सरकारी कटकारस्थान नसल्याचं न्यायालयानं शुक्रवारी नमूद केलं. या निर्णयामुळं भारतीय जनता पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून निकाल येताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एएनआयला सविस्तर मुलाखत देत आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले अमित शहा?

  • भाजप व तत्कालीन मोदी सरकारवर झालेले आरोप हे राजकीय हेतूनं प्रेरित होते हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं एक प्रकारे सिद्ध झालं आहे. एक शब्दही न उच्चारता नरेंद्र मोदी १८ ते १९ वर्षे ही लढाई लढले. भगवान शंकराप्रमाणे विषाचे घोट घेत राहिले. टीका सहन करत राहिले. मी अत्यंत जवळून त्यांच्या दु:ख पाहिलं आहे. मजबूत मनाचा माणूसच हे सगळं सहन करू शकतो. त्यामुळं कोर्टाच्या निकालाचा आनंद आहे.
  • एसआयटी चौकशी सुरू असताना नरेंद्र मोदी यांनी कधीही कुठलाही ड्रामा केला नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा आमदार, खासदारांना निदर्शनं करायला लावली नाहीत. जेव्हा केव्हा एसआयटीनं चौकशीला बोलावलं, नेहमी सहकार्यच केलं.
  • भाजपचे राजकीय विरोधक, एनजीओ आणि राजकीय हेतूनं प्रेरित पत्रकारांच्या त्रिमूर्तीनं भाजपवर दंगलीचे आरोप केले होते. त्यांची यंत्रणा मजबूत असल्यानं लोकांनाही तेच सत्य वाटलं.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात तिस्ता सेटलवाड यांचाही उल्लेख आहे. त्यांच्या एनजीओनं प्रत्येक पोलीस ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अर्ज केला. मीडियाचा इतका दबाव होता की प्रत्येक तक्रार खरी समजून त्याची नोंद केली गेली.
  • जाकिया जाफरी या त्रयस्थ व्यक्तीच्या इशाऱ्यावर काम करत होत्या असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अनेक पीडितांच्या प्रतिज्ञापत्रावर एनजीओनं स्वाक्षरी केली होती. तिस्ता सेटलवाडची एनजीओ हे सगळं करत होती. केंद्रातील यूपीए सरकारनं तिला पूर्ण मदत केली.
  • गुजरात दंगल पूर्वनियोजित नव्हती, उत्स्फूर्त होती. गोध्रा इथं ट्रेन जाळली गेल्यानंतर ही प्रतिक्रिया उमटली होती. १६ वर्षांच्या मुलीसह ५९ लोकांना जिवंत जाळलं गेलं. तेहलकाचं स्टिंग ऑपरेशन सुद्धा न्यायालयानं फेटाळलं आहे. त्याच्या मागचं पुढचं व्हिडिओ फूटेज आल्यानंतर हे ऑपरेशन राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं कोर्टाच्या समोर आलं.
  • गुजरात पोलिसांनी दंगलीची परिस्थिती उत्तमरित्या हाताळली होती. मात्र, ट्रेन जाळल्याच्या घटनेमुळं लोकांमध्ये इतका रोष होता की ते कुणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांनाही जुमानत नव्हते.
  • सरकारच्या पातळीवर कुठलीही दिरंगाई झाली नव्हती. ज्या दिवशी बंद पुकारला गेला, त्याच दिवशी दुपारी लष्कराला पाचारण करण्यात आलं. खुद्द न्यायालयानं त्याबद्दल सरकारचं कौतुक केलं.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळं मोदींवरील सर्व आरोप फोल ठरले आहेत. भाजपच्या सरकारवरील डागही धुवून काढला गेला आहे. मोदींची अनेकदा चौकशी झाली. पण कोणीही त्यास विरोध केला नाही. पोलिसांना सहकार्य केलं. राज्यघटनेचा आदर कसा करायचा याचं उदाहरण मोदींनी सर्वांसमोर ठेवलं. ज्यांनी हे आरोप लावले त्यांनी आपल्या विवेकबुद्धीला जागून माफी मागावी.

WhatsApp channel