amit malviya : एनडीए सरकारच्या शपथविधीला २४ तास पूर्ण होत नाहीत तोच भाजपमध्ये खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भाजपच्या डिजिटल प्रचाराची धुरा सांभाळणारे भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकानं लैंगिक शोषणाचे (sexual misconduct charges) गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळं भाजपमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. काँग्रेसनं तात्काळ हा मुद्दा हाती घेत मालवीय यांच्या चौकशीची व कारवाईची मागणी केली आहे.
काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. त्यानुसार, भाजप नेते राहुल सिन्हा यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य शंतनु सिन्हा यांनी मालवीय यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणासह व इतर गैरप्रकारांचे आरोप केले आहेत.
अमित मालवीय हे अनेक गैर प्रकारामध्ये गुंतलेले आहेत. ते महिलांचे लैंगिक शोषण करतात. केवळ पंचतारांकित हॉटेलांमध्येच नाही तर पश्चिम बंगालमधील भाजपच्या कार्यालयांमध्येही त्यांचे हे काळे कारनामे चालतात, असा आरोप शंतनु सिन्हा यांनी केल्याचे श्रीनेत यांनी म्हटलं आहे.
मालवीय यांच्यापासून पीडित असलेल्या महिलांना न्याय मिळाणं गरजेचं आहे. निष्पक्ष चौकशीसाठी मालवीय यांना सध्याच्या पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी श्रीनेत यांनी केली आहे. मालवीय सध्या भाजपमध्ये ज्या पदावर आहेत, ते पद अत्यंत प्रभावी आहे. हे सत्तेचं पद असून त्याची स्वतंत्र चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळं जोपर्यंत त्यांना पदावरून हटवलं जात नाही, तोपर्यंत न्याय मिळू शकत नाही, असं श्रीनेत यांनी म्हटलं आहे.
अमित मालवीय यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी शंतनु सिन्हा यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. माझ्यावरील आरोप खोटे आहेत. सोशल मीडियावर या संदर्भात करण्यात आलेल्या पोस्टमुळं जनमाणसात माझी प्रतिमा मलिन करणारे आहेत. या संदर्भातील खोटी आणि अपमानास्पद पोस्ट काढून बिनशर्त माफीची मागा, अशी मागणी मालवीय यांनी सिन्हा यांच्याकडं केली आहे. येत्या ११ जून पर्यंत नोटिशीला सकारात्मक उत्तर न मिळाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असं मालवीय यांनी नोटिशीच्या माध्यमातून बजावलं आहे.