Amethi Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल आज मंगळवारी (४ जून) जाहीर झाला. यामध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा जागेवर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. येथे भाजपच्या स्मृती इराणी आणि काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांच्यात लढत झाली. तर बसपकडून नन्हे सिंह चौहान रिंगणात होते.
आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे किशोरी लाल आघाडीवर असल्याचे दिसत आहे. त्यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांच्यावर विजयी आघाडी घेतली आहे किशोरी लाल शर्मा हे ताज्या आकडेवारीनुसार १२६००० हून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजेच किशोरी लाल शर्मा यांचा विजय आता जवळपास निश्चित झालेला आहे.
गेल्या निवडणुकीत या जागेवरून इराणी यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव केला होता.
या दरम्यान, प्रियांका गांधी यांनी किशोरी लाल यांचे अभिनंदन केले आहे. किशोरी लाल यांचे अभिनंदन करताना प्रियंका गांधी यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'किशोरी भैया, मला कधीच शंका नव्हती, मला सुरुवातीपासून खात्री होती की तूम्हीच जिंकाल. तुमचे आणि अमेठीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींचे हार्दिक अभिनंदन!
किशोरी लाल शर्मा हे गांधी घराण्याच्या जवळचे मानले जातात. मूळचे पंजाबमधील लुधियाना येथील रहिवासी शर्मा १९८३ मध्ये राजीव गांधींसोबत रायबरेली आणि अमेठीत दाखल झाले होते. पुढे, राजीव गांधींच्या आकस्मिक निधनानंतर, त्यांचे गांधी घराण्याशी संबंध कौटुंबिक बनले आणि ते गांधी कुटुंबाचाच एक भाग राहिले.
१९९१ मध्ये राजीव गांधी यांच्या निधनानंतर शर्मा यांनी कधी शीला कौल यांचे काम हाती घेतले तर कधी सतीश शर्मा यांना मदत केली. अशा परिस्थितीत शर्मा वारंवार रायबरेली आणि अमेठीला भेट देत राहिले.
मात्र, जेव्हा सोनिया गांधींनी पहिल्यांदा सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि अमेठीतून निवडणूक लढवली तेव्हा केएल शर्मा त्यांच्यासोबत अमेठीत आले.
जेव्हा सोनिया गांधींनी राहुल गांधींसाठी अमेठीची जागा सोडली आणि ते स्वतः रायबरेलीला आले तेव्हा केएल शर्मा यांनी रायबरेली आणि अमेठी या दोन्ही जागांची जबाबदारी स्वतःवर घेतली.
यानंतर हळूहळू वेळ निघून गेला आणि किशोरी लाल शर्मा यांनी रायबरेली आणि अमेठी या दोन्ही भागातील संसदीय कामकाज पाहण्यास सुरुवात केली. कालांतराने लोक काँग्रेस सोडत राहिले, पण केएल शर्मा यांच्या भक्ती आणि निष्ठेमध्ये कधीच कमी आली नाही. किशोरी लाल शर्मा हे सोनिया गांधी यांचे वफादार मानले जातात.
तथापि, हा एकमेव घटक नाही. तर सध्या दिसणाऱ्या परिस्थितीत इतरही अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, अमेठी आणि रायबरेलीमध्ये तळागाळात दीर्घकाळ काम केल्यामुळे, स्थानिक लोक त्यांना चांगले ओळखतात. तसेच, किशोरीलालही जातीय समीकरणातही बसतात. अमेठीमध्ये दलित २६ टक्के, मुस्लिम २० टक्के आणि ब्राह्मण १८ टक्के आहेत.
संबंधित बातम्या