Pratap Sarangi Injured in Parliament : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. आज या वादानं पुढचं टोक गाठलं. संसदेत हा मुद्दा गाजत असताना संसदेबारे आज चक्क धक्काबुक्की झाली. त्यात भाजपचे दोन खासदार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या अपमानाच्या विरोधात काँग्रेसचे खासदार आज संसदेत निदर्शन करत होते. जय भीम, जय भीमच्या घोषणाही सुरू होत्या. यावेळी काही खासदार संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असताना धक्काबुक्की झाली. यात भाजपचे खासदार प्रताप सारंगी व मुकेश राजपूत हे जखमी झाले आहेत. सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही खासदारांनी राहुल गांधी यांच्यावर आरोप केले आहेत. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
'राहुल गांधी यांनी एका खासदाराला धक्का दिला. तो माझ्यावर पडल्यामुळं मी खाली पडलो. मी पायऱ्यांजवळ उभा असताना राहुल गांधी आले आणि त्यांनी एका खासदाराला धक्का दिला. त्याच्या धक्क्यानं मीही खाली पडलो, असं प्रतापचंद्र सारंगी म्हणाले.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. 'राहुल गांधी हे हाणामारी करण्यासाठीच आले होते. त्यांचं वागणं एखाद्या गुंडासारखं होतं. हा देश गुंडगिरी खपवून घेणार नाही. त्यांनी आमच्या एका वयोवृद्ध खासदाराला ढकलून खाली पाडलं, असं दुबे म्हणाले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व प्रकाराचा निषेध केला आहे. संसद हे शारीरिक बळ दाखवण्याचं ठिकाण नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी भाजपच्या खासदारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. 'मी आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. भाजप खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते आणि मला धमक्या देत होते, असं त्यांनी म्हटलं आहे.
प्रताप सारंगी यांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली. 'जखमी अवस्थेतील प्रतापचंद्र सारंगी यांना पाहून वाईट वाटलं. संसदेच्या इतिहासातील हा काळा दिवस आहे. शिष्टाचाराचा भंग झाला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसनं संसद भवनाच्या आवारात ज्या प्रकारची गुंडगिरी केली, तसं भारताच्या इतिहासात कधीच घडलेलं नाही. आम्ही या गुंडगिरीचा निषेध करतो, असं चौहान म्हणाले.