भारतीय परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ अधिकारी अशोक कुमार यांची बेलारुसमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक कुमार यांनी बेलारूसची राजधानी मिन्स्क येथे जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. अशोक कुमार यांनी बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांड्र लुकाशेन्को यांची भेट घेऊन त्यांना भारताच्या राजदूतपदाची ओळखपत्रे सादर केली. अशोक कुमार हे यापूर्वी झांबियामध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून कार्यरत होते.
‘भारत हा दीर्घकाळापासून बेलारुसचा मित्र आणि भागीदार देश आहे. आम्हाला भारतासोबत धोरणात्मक संबंध स्थापित करायचे आहे’, असं राष्ट्रपती अलेक्झांड्र लुकाशेन्को यांची यावेळी सांगितलं. २०२४ साली भारताच्या पाठिंब्यामुळेच बेलारूस ‘शांघाई सहकार्य परिषदे’चा पूर्णवेळ सदस्य देश बनला होता. शिवाय ‘ब्रिक्स’ संघटनेचा भागीदार देश म्हणून आम्हाला ओळख मिळाली. याबद्दल भारताचे आभारी असल्याचे राष्ट्रपती अलेक्झांड्र लुकाशेन्को म्हणाले.
अशोक कुमार यांचा जन्म १० मे १९६७ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी.एससी. (ऑनर्स) भूविज्ञान, एम.एससी. (अनुप्रयुक्त भूविज्ञान) आणि इंजिनीअरिंग भूविज्ञानात एम. फिल. केले आहे. १९९८ साली अशोक कुमार भारतीय परराष्ट्र सेवेत दाखल झाले. २०००-२००३ दरम्यान त्यांनी सीरियामधील भारताच्या दूतावासात आपल्या राजनैतिक कारकिर्दीची सुरुवात केली. या ठिकाणी अशोक कुमार अरबी भाषा शिकले. २००४ मध्ये त्यांची नियुक्ती सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात असलेल्या भारताच्या महावाणिज्य दूतावासात करण्यात आली. तेथे त्यांनी वाणिज्य आणि समुदाय कल्याण विभाग हाताळले होते. २००६ साली ते नवी दिल्लीत भारताच्या परराष्ट्र विभागाच्या मुख्यालयात परतले. येथे त्यांनी पूर्व आणि दक्षिण आफ्रिका विभागात उपसचिव म्हणून काम केले. २००९ साली त्यांची नियुक्ती बर्लिन येथे भारताच्या दूतावासात करण्यात आली. येथे त्यांनी प्रथम सचिव आणि सल्लागार (आर्थिक आणि वाणिज्य) म्हणून काम पाहिले. २०१३ मध्ये त्यांची मॉरिशसमधील भारतीय उच्चायुक्तालयात उप-उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०१८-२०१९ दरम्यान त्यांनी नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयात संयुक्त सचिव (हिंदी आणि संस्कृत) म्हणून काम पाहिले. त्यानंतर जिबूतीमध्ये राजदूत, झांबियामध्ये उच्चायुक्त म्हणूनही अशोक कुमार यांनी काम केले आहे.
संबंधित बातम्या