Mayawati on Mukhtar Ansari Death : उत्तर प्रदेशच्या जेलमध्ये कैदेत असताना माजी आमदार मुख्तार अंसारीच्या मृत्यूबाबत बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्तार अंसारी याचा जेलमध्ये झालेल्या मृत्यूबाबत त्याच्या कुटुंबीयांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. या आरोपांची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी मायावती यांनी सरकारकडे केली आहे. तपासाअंती सत्य काय ते समोर आणले गेले पाहिजे, असं मायावती यांनी म्हटलं आहे.
मायावती यांनी X वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्तार अंसारीने उत्तर प्रदेशातील मऊ विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधीत्व केले होते. दोन वेळा बसप, दोन वेळा अपक्ष आणि एकदा कौमी एकता दल पक्षाचा आमदार म्हणून अंसारी विधानसभेवर निवडून गेला होता. एप्रिल २०२३ मध्ये अंसारीला भाजप आमदार कृष्णचंद्र राय यांच्या हत्येप्रकरणी दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर १३ मार्च २०२४ रोजी शस्त्र बाळगण्याचा खोटा परवाना मिळवल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या मुख्तार अंसारीचा काल, गुरूवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे जेल प्रशासनाने सांगितले होते. परंतु मुख्तार अंसारीचा मुलगा उमर अंसारीने जेल प्रशासनावर गंभीर आरोप लावले आहेत. ‘माझ्या वडिलांच्या मृत्यूबाबत प्रशासनाने अद्याप मला काहीही सांगितलेले नाही. प्रसारमाध्यमांद्वारे मला ही बातमी समजली. परंतु आता संपूर्ण देशाला सर्व काही माहीत झाले आहे. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना भेटायला गेलो होतो. परंतु प्रशासनाने मला भेटू दिले नव्हते. त्यांच्यावर विषप्रयोग केला जाणार असल्याचा आरोप आम्ही यापूर्वी केला होता. १९ मार्च रोजी त्यांच्यावर रात्रीच्या जेवणातून विषप्रयोग करण्यात आला होता. आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे.’ असा गंभीर आरोप उमर अंसारी याने केला आहे.
दरम्यान, आज, शुक्रवारी मुख्तार अंसारीचे पोस्टमार्टम केले जाणार आहे. बांदा येथील बांदा मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द केले जाणार आहे. पोस्टमार्टमसाठी पाच डॉक्टरांचं पथक तयार करण्यात आले आहे.
मुख्तार अंसारीच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अमीक जामई यांनी केली आहे. ‘आम्ही मुख्तार अंसारी यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी उभे आहोत. कोणत्याही क्षणी माझी हत्या होऊ शकते अशी शंका मुख्तार अंसारी यांनी पूर्वी बोलून दाखवली होती. त्यांना योग्य वैद्यकीय सुविधा का पुरवण्यात आली नाही? या संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करण्यात यावी' अशी मागणी अमीक जामई यांनी केली आहे.
संबंधित बातम्या