पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सर्वच आरोप पडले तुरुंगाबाहेर!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सर्वच आरोप पडले तुरुंगाबाहेर!

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सर्वच आरोप पडले तुरुंगाबाहेर!

Jan 11, 2025 09:37 PM IST

पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री बेंगळुरू स्थित त्यांच्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एकूण १८ आरोपींपैकी १७ जण जामिनावर सुटले असून विकास पाटील हा आरोपी मात्र अद्याप फरार आहे.

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला आरोपी शरद भाऊसाहेब कळसकर याला बेंगळुरू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अशा प्रकारे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सर्व १७ आरोपी जामिनावर सुटले आहेत. या प्रकरणातील  १८ पैकी १७ आरोपी सध्या जामिनावर सुटले असून, एक आरोपी अद्याप फरार आहेत.

गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ च्या रात्री बेंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर हत्या करण्यात आली होती. लंकेश यांच्या घराबाहेर मोटारसायकलवरून आलेल्या दोन मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर एकूण १८ आरोपींपैकी विकास पाटील हा आरोपी अद्याप फरार आहे.

कळसकर याच्या जामीन अर्जावर ८ जानेवारी रोजी सुनावणी करताना बेंगळुरू येथील प्रधान शहर दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर पै यांनी घटनेच्या कलम २१ अन्वये जलद सुनावणीच्या घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे सांगत कळसकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली.

‘आधीच सांगितल्याप्रमाणे आजच्या घडीला या खटल्यात याचिकाकर्ते वगळता खटल्याला सामोरे गेलेले सर्व आरोपी सध्या जामिनावर आहेत. त्यामुळे याचिकाकर्ता शरद कळसकर हा समानतेच्या आधारावर जामिनासाठी पात्र आहेत. तसेच शरद कळसकर हा ४ सप्टेंबर २०१८ पासून कोठडीत आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक निर्णयांमध्ये वारंवार म्हटलय की जलद सुनावणी हा घटनेच्या कलम २१ च्या व्यापक व्याप्ती आणि आशयामध्ये अंतर्भूत मूलभूत अधिकार आहे. प्रलंबित खटल्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित राहण्याचा कालावधी अकारण लांबला तर घटनेच्या अनुच्छेद २१ ने दिलेल्या निष्पक्षतेला धक्का बसेल असं वृत्त ‘बार अँड बेंच’ या न्यूज पोर्टलने दिलं आहे. या याचिकेला सरकारी पक्षाने विरोध केला आहे. कळसकर याला यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले असून त्याच्या सुटकेमुळे चौकशीत हस्तक्षेप होण्याचा धोका आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलाने केला.

दरम्यान, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. ‘या न्यायालयाने आतापर्यंत १६४ साक्षीदार तपासले. जवळजवळ तितक्याच संख्येने साक्षीदार सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आले आहेत. उर्वरित बहुतांश साक्षीदार हे तपासात गुंतलेले अधिकारी किंवा पोलिस कर्मचारी असल्याने हस्तक्षेपाची शक्यता कमी होते.' या प्रकरणाच्या सुनावणीनंतर कळसकर याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. 

या प्रकरणातील आरोपी एन मोहन नायक याला ७ डिसेंबर २०२३ रोजी सर्वप्रथम जामीन मिळाला होता. त्यानंतर भारत कुराणे, श्रीकांत पांगारकर, अमित दिघवेकर, केटी नवीन कुमार आणि सुरेश एचएल यांना जामीन मिळाला. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात बेंगळुरू सत्र न्यायालयाने अमोल काळे, राजेश बंगेरा, वासुदेव सूर्यवंशी, ऋषिकेश देवडेकर, परशुराम वाघमोरे, गणेश मिस्किन, अमित रामचंद्र बद्दी आणि मनोहर दुंदीपा यादवे या आठ आरोपींना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर हे आरोपी विजयपुरा या आपल्या मूळ गावी परतले होते. तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले होते. सुरेश आणि सुथ कुमार हे अन्य दोन आरोपीही जामिनावर बाहेर आहेत.

या सर्व आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३०२, १२० ब, ११८, २०३, ३५ भारतीय दंड संहिता, भारतीय शस्त्र कायदा १९५९ चे कलम २५ (१) आणि २७ (१) आणि कर्नाटक संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा २००० चे कलम ३ (१) (१), ३ (२), ३ (३) आणि ३ (४) अन्वये खटला चालविला जात आहे.

लंकेश यांच्या हत्येच्या घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. एमएम कलबुर्गी आणि दाभोलकर यासारख्या विवेकवादी विचारवंतांना टार्गेट केल्याचा आरोप असलेल्या अतिउजव्या हिंदू गटांवर आंतरराष्ट्रीय लक्ष वेधले गेले होते. 

गौरी लंकेश यांच्या हत्येचा संबंध ३० ऑगस्ट २०१५ रोजी याच बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या प्राध्यापक कलबुर्गी यांच्या हत्येशी असल्याचे फॉरेन्सिक पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये कोल्हापुरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते गोविंद पानसरे, ऑगस्ट २०१५ मध्ये धारवाड येथे कन्नड भाषेचे अभ्यासक एमएम कलबुर्गी आणि सप्टेंबर २०१७ मध्ये बेंगळुरू येथे पत्रकार गौरी लंकेश अशा तीन बुद्धिवादी कार्यकर्त्यांच्या अशाच प्रकारच्या हत्येच्या साखळीतील दाभोलकर यांची हत्या ही पहिलीच घटना होती. संशयितांमध्ये हिंदु जनजागृती समिती आणि त्याची सहयोगी संस्था असलेली गोव्यातील सनातन संस्थेचे विद्यमान आणि माजी सदस्यांचा या हत्येच्या कटांमध्ये हात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र या संस्थांनी हे आरोप फेटाळले होते. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर