NHAI on paytm fastag : पेटीएम फास्टॅग दोन दिवसांत बदला, नाहीतर...; हायवे ऑथॉरिटीनं वाहनचालकांना केलं सावध
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  NHAI on paytm fastag : पेटीएम फास्टॅग दोन दिवसांत बदला, नाहीतर...; हायवे ऑथॉरिटीनं वाहनचालकांना केलं सावध

NHAI on paytm fastag : पेटीएम फास्टॅग दोन दिवसांत बदला, नाहीतर...; हायवे ऑथॉरिटीनं वाहनचालकांना केलं सावध

Mar 13, 2024 06:45 PM IST

NHAI alert on Paytm Fastag : पेटीएम फास्टॅग खात्यात येत्या १५ मार्चपासून रिचार्ज करता येणार नसल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं वाहनचालकांना सावध केलं आहे.

पेटीएम फास्टॅग दोन दिवसांत बदला, नाहीतर...; हायवे ऑथॉरिटीनं वाहनचालकांना केलं सावध
पेटीएम फास्टॅग दोन दिवसांत बदला, नाहीतर...; हायवे ऑथॉरिटीनं वाहनचालकांना केलं सावध

Paytm Fastag Expiry : टोल भरण्यासाठी तुम्ही पेटीएम फास्टॅगचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं (NHAI) पेटीएम फास्टॅग धारकांना १५ मार्चच्या आधी इतर बँकेचा फास्टॅग घेण्याची सूचना केली आहे. तसं न केल्यास टोलनाक्यावर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं, असं एनएचएआयनं म्हटलं आहे.

नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) काही दिवसांपूर्वी पेटीएम पेमेंट्स बँकेवर निर्बंध लादले आहेत. तसंच, पेटीएम फास्टॅगच्या रिचार्जवरही बंदी घातली आहे. आरबीआयच्या निर्देशानुसार, १५ मार्चपासून पेटीएम फास्टॅग इनअॅक्टिव्ह होणार आहे. तोपर्यंत पेटीएम फास्टॅग खात्यातील रक्कम वापरता येणार आहे. मात्र, १५ मार्चनंतर त्यात रिचार्ज करता येणार नाही. त्यामुळं त्याआधीच अन्य बँकेचा फास्टॅग घ्यावा, असं प्राधिकरणानं सुचवलं आहे.

आरबीआयच्या निर्देशांनंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला फास्टॅग पुरवठादारांच्या यादीतून काढून टाकलं आहे. फास्टॅग खाती बँकांमध्ये ट्रान्सफर करता येणार नाहीत, असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळं ज्यांच्याकडं पेटीएमचा फास्टॅग आहे, त्यांनी त्यांचं खातं बंद करून ते पैसे काढणं अपेक्षित आहे.

…तर दुप्पट टोल भरावा लागेल!

जर तुम्ही पेटीएमचा फास्टॅग बदलला नाही आणि तुमच्या खात्यातील शिल्लक संपली तर तुम्हाला रोख पैसे द्यावे लागतील. कॅशनं टोल भरल्यास तो दुप्पट लागेल. ते टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. महामार्ग प्राधिकरणानं पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांना त्यांच्या बँकेशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास IHMCL च्या वेबसाइटला भेट देऊन शंकानिरसन करता येणार आहे.

फास्टॅग पुरवठादार बँकांची यादी

सध्या एकूण ३९ बँका व बिगर बँकिंग वित्त संस्थांना (NBFC) फास्टॅग जारी करण्याची परवानागी देण्यात आली आहे. यात एअरटेल पेमेंट्स बँक, ॲक्सिस बँक लिमिटेड, बंधन बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक यांचा समावेश आहे. 

याशिवाय, अलाहाबाद बँक, AU स्मॉल फायनान्स बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, सिटी युनियन बँक लिमिटेड, कॉसमॉस बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फेडरल बँक, फिनो पेमेंट बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, जे अँड के बँक, कर्नाटक बँक, करूर वैश्य बँक, लिव्हक्विक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर नागरी सहकारी बँक लिमिटेड, पंजाब महाराष्ट्र बँक, सारस्वत बँक, साउथ इंडियन बँक, सिंडिकेट बँक, द जळगाव पीपल्स को-ऑप बँक, त्रिशूर जिल्हा सहकारी बँक आणि युको बँकेलाही अधिकार देण्यात आले आहेत.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर