Mahakumbh 2025: महाकुंभाचा प्रवास झाला आणखी स्वस्त, विमानाच्या भाड्यात ५० टक्क्यांनी कपात, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Mahakumbh 2025: महाकुंभाचा प्रवास झाला आणखी स्वस्त, विमानाच्या भाड्यात ५० टक्क्यांनी कपात, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

Mahakumbh 2025: महाकुंभाचा प्रवास झाला आणखी स्वस्त, विमानाच्या भाड्यात ५० टक्क्यांनी कपात, केंद्रीय मंत्र्यांची घोषणा

Feb 01, 2025 07:41 AM IST

Kumbh Mela 2025: महाकुंभात जाण्याचे नियोजन करणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय मंत्र्यांनी प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमान भाड्यात ५० टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे.

प्रयागराजला जाणाऱ्या विमानाच्या भाड्यात ५० टक्क्यांनी कपात
प्रयागराजला जाणाऱ्या विमानाच्या भाड्यात ५० टक्क्यांनी कपात (PTI)

2025 Prayagraj Kumbh Mela: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांना दिलासा देणारी बातमी आहे. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी प्रयागराजला जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमान भाड्यात ५० टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. ही नवी भाडेरचना आजपासून लागू झाली आहे. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राममोहन नायडू यांनी ही माहिती दिली.

सरकारने याआधीच विमान कंपन्यांना तिकीट दरात कपात करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी त्यांच्यासोबत तीन बैठकाही झाल्या. भाडेकपातीच्या अंमलबजावणीबाबत चर्चा झाली. कुंभमेळ्यासारखा भव्य धार्मिक कार्यक्रम १४० वर्षांतून एकदा होतो आणि हे महत्त्व लक्षात घेऊन त्यांनी आपल्या भाड्यात सुधारणा करावी, याची आठवण विमान कंपन्यांना करून देण्यात आली.

त्याचबरोबर भाडेकपातीमुळे विमान कंपन्यांचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही, याचीही काळजी सरकारने घेतली. याआधी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान कंपन्यांना प्रयागराजला जाणाऱ्या विमानांचे भाडे तर्कसंगत करण्याचे निर्देश दिले होते. २३ जानेवारी रोजी डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत बैठक घेतली होती.

प्रयागराजला ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या वाढली

जानेवारी महिन्यात डीजीसीएने वाढीव मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त ८१ उड्डाणांना मंजुरी दिली होती. विमान कंपन्या आता आधीपेक्षा जास्त उड्डाणे चालवत आहेत. प्रयागराजला ये-जा करणाऱ्या विमानांची संख्या १३२ झाली आहे. तथापि, या अतिरिक्त उड्डाणांमुळे विशेषत: दिल्ली-प्रयागराज मार्गावरील विमान भाड्यात ही मोठी वाढ झाली आहे, जी २१ पटीने वाढली आहे.

कुंभमेळ्याला १३ जानेवारीपासून सुरुवात

कुंभमेळ्याला १३ जानेवारीपासून सुरुवात झाली असून २६ फेब्रुवारीला या कुंभमेळ्याचा समारोप होणार आहे. कुंभमेळ्यात आतापर्यंत २० कोटींहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला प्रमुख स्नान घाटांवर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.

भाविकांसाठी विशेष सुविधा

कुंभमेळा परिसरात तात्पुरते शहर उभारण्यात आले आहे. हे सुमारे ४ हजार हेक्टर म्हणजेच ९ हजार ९९० एकर क्षेत्रावर पसरलेले आहे. याचा आकार सुमारे साडेसात हजार फुटबॉल मैदानांच्या क्षेत्रफळाएवढा आहे. लाखो भाविकांना राहण्यासाठी दीड लाखांहून अधिक तंबू आणि तेवढ्याच संख्येने स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर