पुणे : भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका असलेल्या ‘आयएनएस विक्रांत’ च्या समुद्री चाचण्या या पूर्ण झाल्या आहेत. या जहाजावर सध्या लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू आहेत. पुढील जून महिन्यापर्यंत या युद्धनौकेवर लढाऊ विमाने तैनात करण्यात येतील,’ असा विश्वास नौदलप्रमुख अडमिरल आर. हरी कुमार यांनी बुधवारी व्यक्त केला.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४३ व्या दीक्षांत संचलन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून नौदल प्रमुख अडमिरल आर. हरी कुमार उपस्थित होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली.
नौदल प्रमुख हरी कुमार म्हणाले, ‘नौदलाच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी सरकारचे पाठबळ मिळत असून भारतीय नौदलात विविध लढाऊ जहाजे दाखल होत आहेत.
‘नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस विक्रांत’ ही भारतीय बनावटीची पाहिकी युद्धनौका दाखल झाली आहे. सध्या या जहाजाच्या काही चाचण्या सुरू आहेत. अजून पूर्णपणे हे जहाज नौदलात समाविष्ट होण्यासाठी जहाजावर लढाऊ विमाने उतरवण्याच्या चाचण्या सुरू आहेत. या चाचण्या मे महिन्यापर्यंत पूर्ण होऊन जून महिन्यापर्यंत हे विमानवाहू जहाज खऱ्या अर्थाने विमानसज्ज होईल असे हरिकुमार यांनी सांगितले. सध्या लढाऊ विमाने उतरविण्याची प्रणाली तपासणीचे काम सुरू आहे. या चाचण्यांसाठी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागतो. पुढील वर्षातील मान्सूनपर्यंत या चाचण्या पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.
‘नौदलाचा स्वयंपूर्णतेवर विश्वास असून, त्या अनुषंगाने आधुनिकीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे,’ असे सांगत त्यांनी नौदलाच्या आधुनिकीकरणाच्या योजनांविषयी माहिती दिली.
‘एनडीए’मध्ये महिला छात्रांना प्रवेश देण्याचा निर्णय ‘महत्त्वपूर्ण’ असल्याचा विश्वास नौदल प्रमुख अडमिरल आर. हरी कुमार यांनी व्यक्त केला. ‘सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानता (जेंडर न्यूट्रल) आहे. नौदलाने महिला खलाशांना सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ‘अग्निवीर’ योजनेअंतर्गत खलाशांची तीन हजार रिक्त पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी दहा लाख अर्ज आले आहेत. त्यापैकी ८२ हजार अर्ज महिलांचे आहेत,’ असेही त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या