Air India Wi Fi service : विमान प्रवासात देखील इंटरनेटची सुविधा मिळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. एअर इंडियाने १ जानेवारी २०२५ पासून आपल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाय-फाय इंटरनेट सेवा सुरू केली आहे. एअरबस ए ३५०, बोईंग ७८७-९ आणि निवडक एअरबस ए ३२१ निओ विमानामध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासह, एअर इंडिया देशांतर्गत उड्डाणांमध्ये देखील इन-फ्लाइट वाय-फाय सुरू करणारी भारतातील पहिली विमान कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे ही सेवा सध्या प्रवाशांना मोफत दिली जाणार आहे.
एअर इंडियाचे चीफ कस्टमर एक्सपीरियंस ऑफिसर राजेश डोगरा यांनी या बाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले, 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा आजच्या प्रवासाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. काहींसाठी, हे रिअल-टाइम शेअरिंग आहे, तर इतरांसाठी उत्पादकता व कार्यक्षमता वाढविण्याचा हा एक महत्वाचा मार्ग आहे. आम्हाला विश्वास आहे की आमचे प्रवासी या नवीन सुविधेचे स्वागत करतील व विमान प्रवासात देखील आता इंटर कनेक्टिव्हिटीसह प्रवासाचा आनंद घेतील.
ही सेवा प्रवाशांना लॅपटॉप, टॅब्लेट आणि स्मार्टफोन (आयओएस आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम) सारख्या वाय-फाय सक्षम उपकरणांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. १० हजार फूट उंचीवर विमानातील प्रवाशांना एकाच वेळी अनेक उपकरणे या वायफाय सुविधेमुळे जोडता येणार आहेत. प्रवाशांना त्याचा अनुभव घेता यावा, यासाठी ही सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एअर इंडियाने यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमान सेवेत पायलट प्रोग्राम म्हणून ही सेवा सुरू केली होती. यामध्ये न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस आणि सिंगापूर सारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. आता देशांतर्गत विमान उड्डाणांमध्येही ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही वाय-फाय सुविधा यानंतर हळूहळू इतर उड्डाणांमध्येही दिली जाणार आहे.
नवीन सेवेमुळे एअर इंडियाच्या प्रवाशांना इंटरनेट ब्राउझ करणे, सोशल मीडियाचा वापर करणे, ऑनलाइन काम करणे किंवा मित्र आणि कुटुंबियांशी कनेक्ट राहणे शक्य होणार आहे. विशेषत: व्यावसायिक प्रवाशांसाठी ही सुविधा वरदान ठरू शकते, कारण ते उड्डाणादरम्यानही आपले काम सुरू ठेवू शकतील.
भविष्यात उड्डाणादरम्यान या सेवेसाठी शुल्क देखील आकारले जाण्याची शक्यता आहे, असे संकेत एअर इंडियाने दिले आहे. मात्र, सध्या तरी ही सेवा मोफत प्रवाशांना दिली जात आहे. या नव्या उपक्रमाद्वारे एअर इंडियाने त्यांच्या प्रवाशांना आधुनिक आणि प्रगत उड्डाणाचा अनुभव देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.
संबंधित बातम्या