Air India: एअर इंडियाच्या विमानासह सात विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी, एकाचे कॅनडात आपत्कालीन लँडिंग!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Air India: एअर इंडियाच्या विमानासह सात विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी, एकाचे कॅनडात आपत्कालीन लँडिंग!

Air India: एअर इंडियाच्या विमानासह सात विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी, एकाचे कॅनडात आपत्कालीन लँडिंग!

Oct 15, 2024 11:51 PM IST

Air India Flight : दिल्लीवरून शिकागोला जाणाऱ्या एका एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर दिल्लीवरून शिकागोला जाणाऱ्या विमानाचे कॅनडामध्ये आप्तकालीन लँन्डिंग करण्यात आले.

एअर इंडिया विमान (संग्रहित छायाचित्र)
एअर इंडिया विमान (संग्रहित छायाचित्र)

गेल्या काही दिवसांत विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या मिळाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता मंगळवारी देखील ७ वेगवेगळ्या विमानांमध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यामुळे मोठी खळबळ उडाली. 

नवी दिल्लीहून शिकागोला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर हे विमान कॅनडा विमानतळावर उतरले गेले. याचबरोबर तासाभरात देशातील एकूण सात विमानांना बॉम्बची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर ही विमाने जवळच्या विमानतळावर उतरवण्यात आली. याची कसून चौकशी केली जात आहे. एअर इंडिया व्यतिरिक्त स्पायसजेट, इंडिगो आणि अकासा विमानांनाही अशाच प्रकारच्या धमक्या आल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांनी विमानांना धमकी देणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी दिल्लीहून शिकागोला जाणारे एआय-१२७ क्रमांकाचे विमान खबरदारीचा उपाय म्हणून कॅनडातील इलुइट विमानतळावर उतरले गेले. निर्धारित सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विमान आणि प्रवाशांची पुन्हा तपासणी केली जात आहे. प्रवाशांचा प्रवास पुन्हा सुरू होईपर्यंत त्यांच्या मदतीसाठी एअर इंडियाने विमानतळावर एजन्सी सक्रिय केल्या आहेत. विमानात बॉम्बची धमकी असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अमेरिकेला जाणाऱ्या विमानासह चार विमानांना सोशल मीडिया हँडलवरून बॉम्बस्फोटाची धमकी देणारे संदेश मिळाले. यानंतर विविध विमानतळांवर विशिष्ट दहशतवादविरोधी पथकांसह सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एक्स हँडलद्वारे धमकी देण्यात आलेल्या चार विमानांमध्ये जयपूरहून अयोध्येमार्गे बेंगळुरूला जाणारे एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान (आयएक्स ७६५), दरभंगा ते मुंबई स्पाइस जेटचे विमान (एसजी ११६), सिलिगुडी ते बेंगळुरू अकासा एअरचे विमान (क्यूपी १३७३) आणि एअर इंडियाचे दिल्ली ते शिकागो विमान (एआय १२७) यांचा समावेश आहे.

फ्लाइट रडार २४ नुसार, एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय-१२७ भारतीय वेळेनुसार पहाटे ३.०० वाजता नवी दिल्लीहून शिकागोसाठी रवाना झाले आणि अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी ७:०० वाजता शिकागोयेथे उतरणार होते, परंतु त्यापूर्वीच विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आल्यानंतर बोईंग ७७७ विमान कॅनडात उतरले गेले.

भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटांनी हे विमान कॅनडाच्या विमानतळावर होते आणि ते पुढे उड्डाण करू शकले नाही. दरम्यान, एअर इंडियाने म्हटले आहे की, अलीकडच्या काळात एअरलाइन्स तसेच इतर स्थानिक विमान कंपन्यांना अनेक धमक्यांचा सामना करावा लागला आहे. सोमवारी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर दिल्लीकडे वळविण्यात आले होते. स्टँडर्ड सेफ्टी प्रोटोकॉलचे पालन करत विमानाची कसून तपासणी करण्यात आली. विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर