टीम इंडियाने तब्बल १७ वर्षानंतर टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे. मात्र अंतिम सामन्यानंतर आलेल्या वादळामुळे टीम इंडिया बार्बाडोसमध्येच अडकून पडली. त्यानंतर टीम इंडियाला मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाने विमान पाठवण्याची घोषणा केली. विजेत्या भारतीय संघाला बार्बाडोसयेथून बाहेर काढण्यासाठी एअर इंडियाने विमान पाठवले. मात्र आता वेगळीच माहिती मिळाली आहे. कंपनीने आपल्या विमानाची मार्ग बदलून विमान बार्बाडोसकडे वळवल्याने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एअर इंडियाकडून अहवाल मागविला आहे.
नेवार्क ते दिल्ली नियमित उड्डाण करण्यासाठी नियोजित असलेले बोईंग ७७७ विमान बार्बाडोसकडे वळवल्याने डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. यामुळे नेवार्कहून दिल्लीला येणाऱ्या प्रवाशाचा वेळ वाया गेला आहे. डीजीसीएच्या दोन अधिकाऱ्यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे. डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, एअर इंडियाला वस्तुस्थिती सिद्ध करण्यासाठी अहवाल देण्यास सांगितले आहे.
विमान वाहतूक तज्ज्ञ मोहन रंगनाथन म्हणाले की, उड्डाण रद्द करणे हे डीजीसीएच्या नागरी हवाई वाहतूक नियमांचे (सीएआर) गंभीर उल्लंघन आहे. एअर इंडियाचे प्रवक्ते प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "मुळात भारतीय क्रिकेट संघाचे उड्डाण करणारी विमान सेवा रद्द करावी लागली, त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एअर इंडियाशी संपर्क साधला. त्यावेळी या कामासाठी बी ७७७ ची निवड करण्यात आली.
नेवार्क विमानतळावर एकही प्रवासी अडकलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. नेवार्क-दिल्ली विमानात बुकिंग केलेल्या सर्व प्रवाशांना आधीच माहिती देण्यात आली होती आणि पर्यायही देण्यात आला होता, त्यामुळे कोणाचीही गैरसोय झाली नाही.
त्यानंतरही काही प्रवाशांना विमान रद्द झाल्याची माहिती मिळू शकली नाही, परिणामी ते विमानतळावर आले. मात्र, त्यांना रस्ते मार्गाने न्यूयॉर्कला नेण्यात आले आणि तेथून न्यूयॉर्क-दिल्ली विमानात बसविण्यात आले.
मात्र, पत्नी आणि मुलीसह एआय १०६ वर बुकिंग केलेल्या अंकुर वर्मा या प्रवाशाने दावा केला आहे की, त्यांना विमान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली नाही किंवा नुकसान भरपाईही देण्यात आली नाही. “.. मला अमेरिकन एअरलाइन्सचं दुसरं तिकीट बुक करावं लागलं..."
त्याच्या एक्सवरील पोस्टनंतर डीजीसीएने एअरलाइन्सकडून वस्तुस्थिती तपासण्यासाठी अहवाल मागवला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. टी-२० विश्वचषक विजेता संघ बुधवारी दुपारी २.३० वाजता बार्बाडोसहून रवाना झाला आणि गुरुवारी पहाटे ५.४० वाजता दिल्लीत उतरला.
शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. पण बेरिल चक्रीवादळामुळे हे टीम इंडिया बेटावर अडकली होती.
२ जुलै रोजी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे चार्टर विमान स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री २ वाजता बार्बाडोसच्या ग्रँटले अॅडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. कॉल साइन (विमान चालवण्यापूर्वी विमानाला देण्यात येणारे युनिक कोड) असलेले हे विमान भारतीय संघ, क्रिकेट मंडळाचे अधिकारी आणि भारतीय पत्रकारांच्या संचासह बार्बाडोसहून रवाना झााले.
संबंधित बातम्या