संसदेत राम मंदिराच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चे दरम्यान आज एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ओवैसी म्हणाले की, बाबरी मशीद जिंदाबाद, बाबरी मशीद जिंदाबाद...मशीद होती, आहे व कायम राहील. केंद्र सरकारवर निशाणा साधताना ओवैसी म्हणाले की, मोदी सरकार केवळ एका धर्माची सरकार आहे का? मोदी सरकार केवळ हिंदुत्वाचे सरकार आहे? देशाचा कोणता एक धर्म आहे का? देशाचा कोणताही धर्म नाही.. देशातील मुसलमानांना तुम्ही काय संदेश देत आहात?
अयोध्येचा उल्लेख करताना ओवैसी म्हणाले की, मोदी सरकार केवळ एकाच धर्माची सरकार आहे? की संपूर्ण देशातील धर्मांना मानणारे सरकार आहे? २२ जानेवारी रोजी जल्लोष करून तुम्ही कोट्यवधी मुसलमानांना काय संदेश देत आहात? असा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात का की एका धर्माने दुसऱ्या धर्मावर विजय मिळवला? देशातील १७ कोटी मुस्लिम समाजात वेगळा संदेश देण्याचे काम केले जात आहे. १९९२, २०१९ व २०२२ मध्ये मुसलमानांसोबत धोका केला गेला. मी बाबर, औरंगजेब किंवा जिन्नांचा प्रवक्ता नाही.
६ डिसेंबर १९९२ नंतर देशभरात हिंसाचार झाला होता. तरुणांना तुरुंगात डांबले गेले व वृद्धापकाळात बाहेर सोडले गेले. मी रामाची इज्जत करतो मात्र नथुरामाबद्दल राग आहे. कारण त्याने अशा व्यक्तीची हत्या केली ज्याचे अंतिम शब्द'हे राम' होते. ओवैसीला बाबर बाबत काय विचारले जाते? बोस, नेहरू आणि आपल्या देशाबाबत विचारा..
ओवैसी म्हणाले की, या देशाला कोणताही धर्म नाही. १६ डिसेंबर १९९२ रोजी याच लोकसभेत एका प्रस्तावादरम्यान बाबरी विध्वंसाबाबत खेद व्यक्त करण्यात आला होता, असेही ओवैसी यांनी स्पष्ट केले.