Viral News : सोशल मीडियावर एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, एम्समधील एका डॉक्टरनं त्याच्या लग्नासाठी हुंड्यापोटी ५० कोटी रुपयांची मागणी केली. हे पैसे उभे करण्यासाठी मुलीने आपली संपूर्ण कमाई पणाला लावण्याचं तिने सोशल मिडियावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे ही मुलगी स्वत: डॉक्टर आहे. याबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करत डॉक्टरवर टीका केली आहे. एवढ्या पैशांंचं डॉक्टर काय करणार, असा प्रश्नही काहींनी विचारला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये डॉक्टर फिनिक्स नावाच्या ट्विटर हँडलअसलेल्या एका महिला युजरने दावा केला आहे की, तिच्या मित्राला एम्सच्या एका उच्चपदस्थ युरोलॉजिस्टकडून हुंड्यापोटी ५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. पोस्टनुसार, ज्या मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते, ती हैदराबादमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट अॅनेस्थेसिया स्पेशालिस्ट आहे. डॉक्टर मुलाच्या या मागणीमुळे मुलीला चांगलाच धक्का बसला असल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिले आहे. ही मोठी रक्कम उभी करण्याच्या तयारीत मुलीचे कुटुंबीय गुंतले होते. मुलगा आणि मुलगी दोघेही तेलुगू कुटुंबातील आहेत. तेलुगू समाजात हुंडा पद्धत सक्तीची आहे, असा मुलीच्या कुटुंबीयांचा युक्तिवाद आहे. पोस्ट करणाऱ्या महिलेने लिहिलं आहे की, शेवटी हुंडा घ्यायचा असेल तर एवढं शिक्षण, गुणवत्ता आणि पदाचा काय उपयोग.
एक्सवरील ही पोस्ट २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.४५ च्या सुमारास करण्यात आली आहे. ही पोस्ट दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिली आहे. ५० कोटी रुपयांची हुंड्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांनी निवृत्तीची रक्कम देण्याचा निर्णय घेतला. तेलुगू समाजात लग्न होत असेल तर हुंडा द्यावा लागेल, असा त्यांचा युक्तिवाद आहे. या निर्णयामुळे तिचे भवितव्य सुरक्षित तर होईलच, शिवाय तिच्या धाकट्या मुलीलाही त्रास होणार आहे. या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. त्यातच सुशिक्षित लोकांकडून हुंडाप्रथेला प्रोत्साहन दिले जात असल्याची टीका लोकांनी केली आहे.
या पोस्टवर कमेंट करणाऱ्यांनी हुंड्याची मागणी करणाऱ्या डॉक्टरवर जोरदार टीका केली आहे. लोकांनी या डॉक्टरला लोभी म्हटलं आहे. तर मुलीने आणि तिच्या पालकांनी याबाबत भूमिका घेण्याची गरज असल्याचे काही जणांनी म्हटले आहे. मुलगी स्वत: सुशिक्षित असून नोकरी करत असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. ती आपलं आयुष्य खूप चांगल्या प्रकारे जगू शकते आणि स्वतःची ओळख निर्माण करू शकते. एका युजरने लिहिले आहे की, हे अतिशय लाजिरवाणं कृत्य आहे. लोक इतक्या निर्लज्जपणे पैसे कसे मागतात हे मला समजत नाही.