Parshottam Rupala : गुजरात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राजकोट लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसत आहे. क्षत्रिय समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेल्या रुपाला यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे, तर दुसरीकडे त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध करत रुपाला यांच्या पुतळ्याचे दहन करण्यास सुरुवात केली आहे. राजकोट मतदार संघातून जर रुपाला भाजपचे उमेदवार राहिल्यास त्यांच्या विरोधात मतदान करण्याची अशी धमकी क्षत्रिय समाजाने दिली आहे. वडोदरा येथे रूपाला यांना होणारा वाढता विरोध पाहता क्षत्रिय समाजाने पंतप्रधान मोदी यांच्याकडे त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.
रूपाला यांनी क्षत्रिय समजाविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याने रुपाला यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. हा वाढता विरोध कमी करण्यासाठी भाजपचे गुजरातमधील सर्वात ताकदवान नेते आणि राज्याचे पक्षप्रमुख सी. आर. पाटील यांनी राजकोट-सुरेंद्र नगर परिसरात क्षत्रिय नेत्यांची समजून काढून देखील रूपाला यांचा विरोध कमी होत नसल्याने भाजपच्या अडचणी वाढतांना दिसत आहे.
पाटीदार समाजातून आलेले रुपाला सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. ते दोन वेळा राज्यसभेवर निवडून गलेले आहेत. यावेळी पक्षाने त्यांना राजकोटमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. रुपाला ही मूळची अमरेली जिल्ह्यातील आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते शिक्षक होते. रुपाला हे उत्तम वक्ते असून त्यांच्या भाषणांसाठी गुजरातमध्ये ते प्रसिद्ध आहेत. मात्र राजकोटमधून तिकीट मिळाल्यानंतर वाल्मिकी समाजाच्या एका कार्यक्रमात क्षत्रिय समाजाविरोधात त्यांनी आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने आता त्यांचा विरोधात आंदोलने केली जात आहेत. हा वाद चिघळला असून अद्याप थांबलेला नाही. रुपाला यांच्या वक्तव्या प्रकरणी गुजरात निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी अहवाल मागवला आहे, तर दुसरीकडे राज्यातील जवळपास ९० क्षत्रियांच्या संघटना रुपाला यांना देण्यात आलेली उमेदवारी रद्द करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, रुपाला यांनी त्यांच्या व्यक्तव्या बाबत दिलेले स्पष्टीकरणही क्षत्रिय समाजाने फेटाळून लावले आहे.
६९ वर्षीय रुपाला हे २२ वर्षांनंतर गुजरातमध्ये निवडणूक लढवत आहेत. त्यांनी अखेरची विधानसभा निवडणूक २००२ मध्ये अमरेलीतून लढवली होती. या निवडणुकीत त्यांना काँग्रेस नेते परेश धनानी यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. रुपाला यांनी तेव्हापासून निवडणूक लढवली नाही, जरी त्यांनी यापूर्वी १९९१ ते २००२ पर्यंत अमरेलीतून तीनदा विजय मिळवला होता. दरम्यान, रुपाला यांनी गुजरातमध्ये अनेक मंत्रीपदे आणि जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मात्र, त्यांनी थेट निवडणूक गेल्या २२ वर्षात लढवली नाही. रूपाला हे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. परशोत्तम रुपाला हे सहसा खूप विचारपूर्वक भाषणे करतात. पण यावेळी त्यांची घसरलेल्या जीभेमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या विधानावरून वाद इतका वाढला आहे की, काँग्रेस नेते आणि क्षत्रिय नेते आदित्य सिंह गोहिल यांनी परशोत्तम रुपाला यांच्याविरोधात कोर्टात मानहानीची याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्जावर सुनावणी होणार आहे. मानहानीच्या तक्रारीवर १५ एप्रिलला सुनावणी होणार आहे.
२४ मार्च रोजी केंद्रीय मंत्री परसोत्तम रुपाला यांनी राजकोट येथे एका कार्यक्रमात म्हटले की, गुजरातच्या महाराजांनी (क्षत्रिय राजे) इंग्रजांसोबत रोटी आणि बेटीचा व्यवहार केला. परंतु दडपशाही करूनही दलित समाजाने ना धर्मांतर केले, ना वर्तनात बदल केले, रुपाला यांच्या या वक्तव्यामुळे राजपूत समाजात संताप पसरला आहे. क्षत्रिय समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर परशोत्तम रुपाला यांनी माफी देखील मागितली. मात्र, असे असले तरी हा वाद थांबन्याचे नाव घेत नाही. रुपाला यांनी मात्र आपल्या वक्तव्यात क्षत्रिय हा शब्द वापरला नाही. त्यांनी आपल्या निवेदनात महाराज असा शब्द वापरला होता. रुपाला हे सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री आहेत.
संबंधित बातम्या