मुस्लिमांची परिस्थिती कठीण, घरही भाड्यानं मिळत नाही; दिवंगत नेत्याच्या मुलीनं सांगितला अनुभव
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  मुस्लिमांची परिस्थिती कठीण, घरही भाड्यानं मिळत नाही; दिवंगत नेत्याच्या मुलीनं सांगितला अनुभव

मुस्लिमांची परिस्थिती कठीण, घरही भाड्यानं मिळत नाही; दिवंगत नेत्याच्या मुलीनं सांगितला अनुभव

Feb 27, 2024 05:51 PM IST

Mumtaz Patel on Indian Muslims : काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या कन्या मुमताज पटेल यांनी देशातील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल परखड मत व्यक्त केलं आहे.

Mumtaz Patel on Indian Muslims
Mumtaz Patel on Indian Muslims

Mumtaz Patel news : गुजरातमधील भरूच लोकसभेची जागा आम आदमी पक्षाला सोडण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांच्या कन्या मुमताज पटेल पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. देशातील मुस्लिमांच्या स्थितीबद्दल त्यांनी केलेलं विधान यासाठी कारण ठरलं आहे. देशातील मुस्लिमांची परिस्थिती कठीण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

'न्यूज २४' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. या मुलाखतीला आगामी लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी होती. त्याबाबत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्याचबरोबर, देशातील मुस्लिमांविषयीच्या एका प्रश्नावरही त्यांनी परखड आणि सविस्तर भाष्य केलं.

भारतात मुस्लिम सुरक्षित आहेत का? असा प्रश्न मुमताज यांना विचारण्यात आला होता. त्यावर, ‘खूप कठीण परिस्थिती आहे. एक मुसलमान असल्यामुळं मी हे नीट सांगू शकते. आयुष्य तितकं सोपं राहिलेलं नाही. आजही मला भाड्यानं घर घ्यायचं असेल तर मला ते मिळत नाही. अगदी दिल्लीसारख्या शहरातही नाही. मी घर शोधतेय, पण मला मिळत नाही. कारण आम्ही मुस्लिम आहोत. दोन वर्षांपूर्वी माझ्या आईलाही मिळालं नव्हतं. आजही तीच परिस्थिती आहे,' असं मुमताज म्हणाल्या.

'आम्हाला घर न मिळण्यामागे दोन कारणं आहेत. एक तर आमची राजकीय पार्श्वभूमी आणि दुसरं म्हणजे आम्ही मुस्लिम. आम्हाला मुसलमानांना घर द्यायचं नाही, असं लोक बेधडकपणे सांगतात. आमच्या बाबतीत असं घडत असेल तर सामान्य मुस्लिमांची स्थिती काय असेल? तळागाळात आणि खेड्यापाड्यातील परिस्थितीवर नजर टाकल्यास आणखी वाईट चित्र दिसतं. मुस्लिम खूप खडतर आयुष्य जगत आहेत. मुस्लिम काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मुलांना नोकऱ्यांवरून काढलं जातंय. ही गुजरातची स्थिती आहे, उत्तर प्रदेशात तर याहून भयानक परिस्थिती आहे. पोलीस मुस्लिमांच्या तक्रारीही नोंदवून घेत नाहीत, असा थेट आरोपही त्यांनी केला.

आम आदमी पक्षाच्या उमेदवाराला काँग्रेसची मत मिळतील?

भरूचची जागा आम आदमी पक्षाला दिली गेल्याबद्दल मुमताज यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली. ‘काँग्रेसचे मतदार आणि पाठीराखे ‘आप’च्या उमेदवाराला मतदान करतील की नाही याची शाश्वती नाही. 'आप'चे उमेदवार चैतर वसावा यांचाही मुमताज यांनी समाचार घेतला. 'अहमद पटेलांचा कुठला मतदारसंघच नाही, असं बोलणारे आता ही जागा जिंकून अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहणार असल्याचं सांगत प्रचार करत आहेत, असं त्या म्हणाल्या.

‘मी पक्षाच्या विरोधात कुठलीही बंडखोरी वगैरे केलेली नाही. मात्र, कार्यकर्त्यांची हमी मी घेऊ शकत नाही. त्यांचं मन वळवणं इतकं सोपं जाणार नाही,’ असं सूचक विधानही त्यांनी केलं.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर