ताजमहलच्या देखभालीत हलगर्जीपणा; भिंतींना तडे गेल्यानंतर आता घुमटामध्ये उगवली झुडपे, फोटो व्हायरल-agra taj mahal dome photo viral of plant growing after cracks found during rain ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ताजमहलच्या देखभालीत हलगर्जीपणा; भिंतींना तडे गेल्यानंतर आता घुमटामध्ये उगवली झुडपे, फोटो व्हायरल

ताजमहलच्या देखभालीत हलगर्जीपणा; भिंतींना तडे गेल्यानंतर आता घुमटामध्ये उगवली झुडपे, फोटो व्हायरल

Sep 19, 2024 07:23 PM IST

Agratajmahal : आग्र्याच्या ताजमहालच्या देखभालीतील हलगर्जीपणाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पावसात ताजमहालला तडे गेल्याचे वृत्त समोर आले होते, अता ताजमहालच्या मध्यवर्ती घुमटाच्या संगमरवरी भिंतीवर एक झुडूप उगवताना दिसत आहे.

ताजमहालावर उगवलेले रोपटे
ताजमहालावर उगवलेले रोपटे

आग्र्याच्या ताजमहालच्या देखभालीतील हलगर्जीपणा समोर आला असून याचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. पावसात ताजमहालला तडे गेल्याच्या बातम्या आल्या होत्या, शाहजहान आणि मुमताज यांच्या कबरीवर पाण्याचे थेंब ही टपकत असल्याचे सांगण्यात आले. आता एका पर्यटकाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ताजमहालच्या मध्यवर्ती घुमटाच्या संगमरवरी भिंतीवर एक वनस्पती उगवताना दिसत आहे. 

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच स्मारकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा वाद निर्माण झाला आहे. पावसाच्या पाण्याच्या गळतीमुळे घुमटाच्या उत्तरेकडील संगमरवरी दगडांमध्ये ही वनस्पती वाढत असल्याचे बोलले जात आहे.

टुरिस्ट गाईड फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस शकील चौहान यांनी सांगितले की, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, एएसआय ताजमहालच्या संवर्धनावर दरवर्षी चार कोटी रुपये खर्च करते.  मात्र भिंतींना तडे जाणे, पाणी टपकणे तसेच झाडे-झुडपे उगवणे या प्रकारामुळे स्मारकाची प्रतिष्ठा मलीन होते. पावसाळ्यानंतर संवर्धनाची कामे जलदगतीने करण्याच्या सूचना त्यांनी पुरतत्व विभागााला दिल्या आहेत. अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ राजकुमार पटेल यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये  ताजमहलच्या भिंतीवरील सर्व वनस्पती काढून टाकण्यात आल्या होत्या. ही वनस्पती गेल्या १५ दिवसांत उगवलेली दिसत आहे. ही तातडीने हटविण्यात येईल.

घुमटावर उगवणाऱ्या अशा वनस्पतींमुळे स्मारक कमकुवत होईल, असे बोलले जात आहे. जर अशा वनस्पती मुळापासून न काढल्यास मोठे नुकसान करू शकतात. मंगळवारी ताजमहालच्या शिल्पग्राम पार्किंगमधील शौचालयाचे छतही कोसळले. मात्र या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पण पावसात ताजमहाल आणि आजूबाजूला घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्मारकाबाबतची चिंता वाढली आहे. आग्रा विकास प्राधिकरणाने शौचालय दुरुस्तीसाठी बंद केले आहे. त्याचबरोबर स्मारकाच्या आजूबाजूच्या काही भागात पावसामुळे पर्यटकांनाही पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले.

Whats_app_banner
विभाग