Dr ram Narayan Agarwal passed away : अग्नी क्षेपणास्त्रांचे जनक प्रसिद्ध क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ डॉ. राम नारायण अग्रवाल यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी अग्रवाल यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांना अग्नी मॅन म्हणून ओळखले जाते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थामध्ये ते अग्नी क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ म्हणून कार्यकत होते. डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार शास्त्रज्ञ राम नारायण अग्रवाल यांचे हैदराबाद येथे निधन झाले.
राम अग्रवाल अग्नी क्षेपणास्त्राच्या पहिल्या योजनेचे संचालक होते. त्यांना आदराने अग्नी अग्रवाल किंवा अग्निमॅन या नावाने संबोधले जात असे.
डॉ. अग्रवाल काही वर्षापूर्वी एएसएलच्या संचालकपदावरून निवृत्त झाले होते. त्यांनी अग्नी क्षेपणास्त्र योजनेचं काम जवळपास दोन दशके पाहिले. त्यांनी क्षेपणास्त्रांच्या वॉरहेडची री एंट्री, कंपोझिट हिट शिल्ड, बोर्ड पोपल्शन सिस्टिम, गाइडन्स आणि कंट्रोल यावर खूप मेहनत घेतली होती.
१९८९ मध्ये डॉ. अग्रवाल आणि त्यांच्या टीमने कार्यक्रम संचालक म्हणून अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी उड्डाण केले होते. देशातील लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमात राम नारायण अग्रवाल यांची महत्त्वाची भूमिका होती. ते अग्नी क्षेपणास्त्रांचे पहिले कार्यक्रम संचालक होते. या कारणास्तव त्यांना 'अग्नी मॅन' म्हणूनही ओळखले जाते. अग्नी, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल (ICBM) कार्यक्रमात भारताने अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन, इस्रायल आणि उत्तर कोरिया या देशांच्या गटात स्थान मिळवले होते.
अग्नी क्षेपणास्त्र हे एक मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्र होते, जे ओडिशाच्या किनारपट्टीवरील बालासोर येथे त्याची चाचणी घेण्यात आली होती. १९८३ ते २००५ पर्यंत डॉ. अग्रवाल अग्नी मिशनचे कार्यक्रम संचालक होते. यानंतर ते प्रगत प्रणाली प्रयोगशाळेचे (एएसएल) संचालक म्हणून निवृत्त झाले.
डीआरडीओच्या ज्येष्ठ, वर्तमान आणि माजी शास्त्रज्ञांनी डॉ अग्रवाल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. डीआरडीओचे माजी प्रमुख आणि क्षेपणास्त्र शास्त्रज्ञ डॉ. जी. सतीश रेड्डी म्हणाले की, देशाने एक महान व्यक्तिमत्व गमावले आहे. ते म्हणाले की, देशातील लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या विकासात डॉ.अग्रवाल यांची महत्त्वाची भूमिका आहे.