मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अग्निपथला विरोध, केंद्राचे एक पाऊल मागे; संरक्षण मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

अग्निपथला विरोध, केंद्राचे एक पाऊल मागे; संरक्षण मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 17, 2022 08:41 AM IST

गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही भरती झालेली नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

केंद्र सरकारने देशभरातून अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) होत असलेल्या विरोधानंतर एक पाऊल मागे घेतलं आहे. लष्कर भरतीसाठी (Indian Amry) आता वयोमर्यादा २१ वरून २३ करण्यात आली आहे. ही वयोमर्यादा फक्त एकदाच लागू असणार आहे. सरकारने सांगितलं की, "गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही भरती झालेली नाही त्यामुळे हा निर्णय घेतला आहे." लष्करात भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणली पण त्याला बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यातील उमेदवार रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. अनेक ठिकाणी रेल्वेला आग लावण्याच्या घटनाही घडल्या.

सरकारने गुरुवारी रात्री अग्निपथ योजनेमध्ये बदलाची घोषणा केली. सुरुवातीला सरकारने या योजनेंतर्गत १७.५ ते २१ या वयोगटातील उमेदवारांना भरती होता येत होते. आता २३ वर्षापर्यंत उमेदवारांना यात सहभागी होता येईल. मात्र वयोमर्यादेत ही वाढ फक्त एका भरतीसाठी करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा वयोमर्यादा २१ वर्षेच राहणार आहे.

अग्निपथ योजनेविरोधात अनेक राज्यात आंदोलन होत आहे. सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की, नव्या मॉडेलमुळे फक्त सशस्त्र बलांमध्येच नवी क्षमता निर्माण होईल असं नाही तर तरुणांना खासगी क्षेत्रातील मार्गही तयार होतील. तसंच सेवा निधी पॅकेजमुळे व्यावसायिक क्षेत्रात उतरण्यासाठीही मदत होईल. सरकारने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतरही अनेक राज्यातील विरोध कायम आहे.

गुरुवारी बिहारमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या डब्यांना आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बिहारचे अप्पर पोलिस महासंचालक संजय सिंह म्हणाले की, आतापर्यंत आम्ही या प्रकरणी १२५ जणांना अटक केली आहे. २० हून अधिक गुन्हे दाखल झाले असून आंदोलनात झालेल्या झटापटीत किमान १६ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या