गरीब रथपाठोपाठ आणखी एका ट्रेनमध्ये साप सापडला आहे. २१ ऑक्टोबर रोजी झारखंडहून गोव्याकडे जाणाऱ्या वास्को-द-गामा एक्स्प्रेसच्या एसी डब्यात जिवंत साप आढळला होता. यामुळे प्रवाशांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली. एसी टू टायर कोचमधील खालच्या बर्थच्या पडद्याजवळ साप सरपटताना अनेक प्रवाशांनी पाहिला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. अंकित कुमार सिन्हा यांनी रेल्वे मंत्रालयाला टॅग करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांचे आई-वडील ए-२ कोचमधून प्रवास करत होते. त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये साप पडद्याभोवती फिरताना दिसत आहे. हे पाहून प्रवाशांमध्ये घबराट आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे की, हा साप २१ ऑक्टोबर रोजी ट्रेन १७३२२ (जसीडीह ते वास्को द गामा) च्या बर्थवर आढळला होता. ही तक्रार माझ्या पालकांची आहे, ते एसी २ टियर (ए २ ३१, ३३) मध्ये प्रवास करत होते. याबाबत कृपया त्वरित कारवाई करा. संदर्भासाठी मी व्हिडिओ जोडले आहेत. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना टॅग करत म्हटले आहे की, "परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आपले त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे.
ट्रेनमध्ये तैनात असलेल्या आयआरसीटीसीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापाला पकडून ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले. एका व्हिडिओमध्ये आयआरसीटीसीचे कर्मचारी आणि एक प्रवासी एकत्र येऊन चादरीचा वापर करून साप पकडताना दिसत आहेत. मात्र, त्यांनी सापासोबत काय केले हे समजू शकलेले नाही.
रेल्वे सेवेच्या पथकाने या ट्विटला उत्तर दिले आणि तातडीने तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. रांचीच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनीही प्रतिक्रिया दिली. 'तुमची तक्रार मान्य करून योग्य त्या अधिकाऱ्याला कळविण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या