घटस्फोटाच्या प्रकरणात तुम्ही ऐकले असेल की, सामान्यपणे पत्नी पतीकडे पोटगीची मागणी करते व न्यायालयही यावर शिक्कामोर्तब करत असते. पत्नीशी विभक्त झाल्यानंतर पतीला प्रत्येक महिन्याला तिला काही पैसे द्यावे लागतात. जेणेकरून ती आपला उदरनिर्वाह चालवू शकेल. मध्य प्रदेशमधील इंदूर येथे अजब प्रकार समोर आला आहे. येथे फॅमिली कोर्टाने ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला घटस्फोटानंतर आपल्या १२ वी पास पतीला ५००० रुपये निर्वाह भत्ता देण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाने बुधवारी हा निकाल देताना २३ वर्षीय अमन कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना म्हटले की, त्यांना आपल्या पत्नीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागेल. अमन बेरोजगार आहे, मात्र त्यांची २२ वर्षीय पत्नी पदवीधर असून शहरात एक ब्यूटी पार्लर चालवत आहे.
याचिकाकर्ते अमन कुमार यांचे वकील मनीष जरोळे यांनी सांगितले की, २०२० मध्ये उज्जैन येथे राहणाऱ्या अमनची एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून नंदिनीशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर नंदिनीने अमनकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान अमनला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा नव्हती. मात्र नंदिनीने त्याला आत्महत्या करण्याची धमकी देत लग्नाला तयार केले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्यांचे आर्य समाज मंदिरात लग्न झाले व भाड्याच्या खोलीत इंदुरमध्ये राहू लागले.
अमनने आपल्या याचिकेत आरोप केला की, लग्नानंतर नंदिनी व तिच्या घरच्या लोकांनी त्रास द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्याला शिक्षण सुरू ठेऊ दिले नाही. लग्नानंतर दोन महिन्यात अमन नंदिनीला सोडून आपल्या आई-वडिलांकडे रहायला गेला.
अमन त्याच्या घरी गेल्यानंतर नंदिनीने पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. अमनने ही एका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याने डिसेंबर २०२३ मध्ये कुटूंब न्यायालयात घटस्फोट व पोटगीसाठी याचिका दाखल केली. दरम्यान नंदिनीने इंदूरमध्ये कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली व न्यायालयात अमनसोबत राहण्यास तयार असल्याचे सांगितले.
अमनच्या वकिलांनी सांगितले की, नंदिनीने न्यायालयात खोटे सांगितले की, ती बेरोजगार आहे व अमन नोकरी करतो. तिच्या जबाबात अनेक विरोधाभास असल्याने न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली.
वकील मनीष जरोळे यांनी सांगितले की, हे अनोखे प्रकरण आहे. यात कोर्टाने नंदिनीला खटल्याचा खर्च म्हणून अतिरिक्त रक्कम देण्याचाही आदेश दिला आहे. नंदिनी आणि तिच्या कुटूंबीयांनी अमनसोबत गैरवर्तन केले होते. नंदिनीने म्हटले की, तिला आपले लग्न टिकवायचे आहे. यामुळे तिने सर्व गोष्टी न्यायालयात सांगितल्या नाहीत, मात्र या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात आव्हान देणार आहे.
संबंधित बातम्या