Taliban Vs Pakistan : पाकिस्तानाला प्रत्युत्तर देण्यासाठी तालिबान सज्ज; सीमेवर रणगाडे व घातक शस्त्रास्त्रे पाठवली
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Taliban Vs Pakistan : पाकिस्तानाला प्रत्युत्तर देण्यासाठी तालिबान सज्ज; सीमेवर रणगाडे व घातक शस्त्रास्त्रे पाठवली

Taliban Vs Pakistan : पाकिस्तानाला प्रत्युत्तर देण्यासाठी तालिबान सज्ज; सीमेवर रणगाडे व घातक शस्त्रास्त्रे पाठवली

Dec 25, 2024 10:56 PM IST

Taliban Vs Pakistan : मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबान सरकारने पाकिस्तानी सीमेवर रणगाडे आणि इतर धोकादायक शस्त्रांची तैनाती वाढवली आहे. यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानच्या सीमेवर तालिबानकडून रणगाडे तैनात
पाकिस्तानच्या सीमेवर तालिबानकडून रणगाडे तैनात (AP)

Taliban Vs Pakistan : पाकिस्तानी हवाई दलाने मंगळवारी रात्री उशिरा अफगाणिस्तानात घुसून टीटीपी या दहशतवादी संघटनेच्या तळांवर केलेल्या हल्ल्यात ४६ जण ठार झाले. पक्तिका प्रांतात एका सशस्त्र गटावर हे हल्ले करण्यात आले. मात्र, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने किंवा मिलिटरी मीडिया विंग, इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सकडून याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

अफगाण तालिबान सरकारचे उपप्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या सीमेचा पूर्व भाग असलेल्या पकतीका प्रांतात हवाई हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत. तालिबान सरकारने पाकिस्तानवर नागरिकांना लक्ष्य करून त्यांची हत्या केल्याचा आरोप केला असून हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी दिली आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तालिबान सरकारने पाकिस्तानी सीमेच्या दिशेने रणगाडे आणि इतर धोकादायक शस्त्रांची तैनाती वाढवली आहे. यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकार पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.

अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानने या हल्ल्यांचा निषेध केला असून मृतांपैकी बहुतांश जण वझिरीस्तान भागात राहणारे निर्वासित असल्याचे म्हटले आहे. त्याला प्रत्युत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री मोहम्मद याकूब मुजाहिद यांनी पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर सीमेवर शस्त्रास्त्रे तैनात करण्यात आली आहेत.

टीटीपी हा स्वतंत्र दहशतवादी गट असला तरी ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणाऱ्या अफगाण तालिबानचा जवळचा मित्र मानला जातो. अफगाणिस्तानातील सीमावर्ती भागात गुप्तचर माहितीच्या आधारे हे हल्ले करण्यात आल्याचे पाकिस्तानने मार्चमध्ये म्हटले होते. पाकिस्तानात गेल्या दोन दशकांत मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले झाले असले तरी अलीकडच्या काही महिन्यांत ही संख्या वाढली आहे. टीटीपीने गेल्या आठवड्यात देशाच्या वायव्य भागातील एका चौकीवर हल्ला केला होता, ज्यात किमान १६ पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते.

 

सामायिक सीमेवरील दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी तालिबान पुरेसे प्रयत्न करत नसल्याचा आरोप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, तालिबान सरकारने पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावत कोणत्याही संघटनेला कोणत्याही देशावर हल्ले करण्याची परवानगी देत नसल्याचे म्हटले आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर