Asaduddin Owaisi : संसदेत 'जय पॅलेस्टाइन' अशी घोषणा देऊन पुरते फसले ओवेसी; खासदारकी धोक्यात
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Asaduddin Owaisi : संसदेत 'जय पॅलेस्टाइन' अशी घोषणा देऊन पुरते फसले ओवेसी; खासदारकी धोक्यात

Asaduddin Owaisi : संसदेत 'जय पॅलेस्टाइन' अशी घोषणा देऊन पुरते फसले ओवेसी; खासदारकी धोक्यात

Jun 26, 2024 04:57 PM IST

asaduddin owaisi jai palestine : खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय पॅलेस्टाइन’ अशी घोषणा देणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी होत आहे.

संसदेत 'जय पॅलेस्टाइन' बोलून पुरते फसले ओवेसी; खासदारकी धोक्यात
संसदेत 'जय पॅलेस्टाइन' बोलून पुरते फसले ओवेसी; खासदारकी धोक्यात

asaduddin owaisi jai palestine : लोकसभेत खासदारकीची शपथ घेताना 'जय पॅलेस्टाइन' अशी घोषणा देणारे एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी हे अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्याकडं तक्रार करण्यात आल्यानं ओवेसी यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ज्येष्ठ वकील हरी शंकर जैन यांनी या संदर्भात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून ओवेसी यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. ओवेसी यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेताना दिलेल्या 'जय पॅलेस्टाईन' या घोषणेवर हरी शंकर जैन यांनी आक्षेप घेतला आहे. देशाच्या संसदेतून त्यांनी पॅलेस्टाईन या परदेशाशी निष्ठा व्यक्त केल्याचं जैन यांचं म्हणणं आहे. त्यामुळं त्यांची खासदारकी रद्द करावी, अशी विनंती जैन यांनी राष्ट्रपतींना केली आहे.

हैदराबादमधून पाचव्यांदा निवडून आलेले ओवेसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी प्रार्थना केली. त्यांच्या शपथविधीनंतर त्यांनी AIMIM for Muslim ची घोषणा दिली. तसंच, जय तेलंगणा, जय भीम अशा घोषणा दिल्या. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. सध्या युद्धाच्या खाईत होरपळत असलेल्या व आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा मतभेदाचा विषय असलेल्या पॅलेस्टाइनच्या बाजूनं त्यांनी घोषणा दिली. त्यांच्या शपथविधीनंतर सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांनी आक्षेप घेतल्यानं सभागृहात गदारोळ सुरू झाला.

ओवेसी यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना ओवेसी यांनी आपल्या भूमिकेवर भाष्य केलं. 'इतर सदस्यही वेगवेगळ्या घोषणा देतात. मी ‘जय भीम, जय मीम, जय तेलंगणा, जय पॅलेस्टाईन’ म्हणालो. त्यात चुकीचं काय आहे? राज्यघटनेतील तरतुदी सांगा? तुम्ही इतरांचंही ऐकावं. महात्मा गांधी पॅलेस्टाईनबद्दल काय म्हणाले होते तेही वाचा, असं ते म्हणाले. पॅलेस्टाइन पीडित असल्यामुळं मी त्यांना पाठिंबा व्यक्त केला, असं ओवेसी म्हणाले.

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि किरेन रिजिजू यांनी ओवेसी यांच्यावर टीका करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. 'असदुद्दीन ओवेसी यांनी संसदेत दिलेला 'जय पॅलेस्टाईन'चा नारा चुकीचा आहे. ते सभागृहाच्या नियमांच्या विरोधात आहे. भारतात राहूनही ते 'भारत माता की जय' अशी घोषणा कधी करत नाहीत,' असा संताप रेड्डी यांनी व्यक्त केला.

'शपथ घेताना दुसऱ्या देशाची स्तुती करणाऱ्या घोषणा देणं अयोग्य आहे. पॅलेस्टाईन किंवा इतर कोणत्याही देशाशी आमचं कोणतंही वैर नाही. मात्र, शपथ घेताना एखाद्या सदस्यानं दुसऱ्या देशाच्या स्तुतीसाठी घोषणा देणे योग्य आहे का, असा प्रश्न संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी उपस्थित केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर