मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narendra Modi: नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावरून भाषण; नेहरूंच्या योगदानाचाही केला उल्लेख

Narendra Modi: नरेंद्र मोदी यांचं लाल किल्ल्यावरून भाषण; नेहरूंच्या योगदानाचाही केला उल्लेख

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 15, 2022 09:58 AM IST

Narendra Modi Speech On Independence Day : आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहन करून देशाला संबोधित केलं आहे.

PM Narendra Modi Live Independence Day On Red Fort Delhi
PM Narendra Modi Live Independence Day On Red Fort Delhi (HT)

Narendra Modi Speech on Independence Day from Red Fort: आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वजाचं ध्वजारोहन करून राष्ट्राला संबोधित केलं आहे. त्यानंतर मोदींनी भारतीयांना देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंह, राजगुरू, अश्फाकउल्लाह खान, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीरांसह अनेक क्रांतिकारकांच्या प्रयत्नानंतर देशाला इंग्रजांच्या गुलामीच्या जोखडातून मुक्तता मिळाली, यात महिलांचाही मोठा वाटा होता, भारतीय महिला काय करू शकतात, हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत मोदींनी राणी लक्ष्मीबाई, दुर्गाभाभी आणि बेगर हजरत महल यांचं स्मरण केलं आहे.

स्वातंत्र्यासाठी भारतातील प्रत्येक व्यक्तीनं इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. यातना सहन केल्या, बलिदान दिलं, आज देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी आपल्याला त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याची मोठी संधी असल्याचं मोदी म्हणाले. याशिवाय मी भारतीय सैन्यालाही सॅल्यूट करतो, कारण त्यांनी नेहमीच जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण केलेलं आहे.

एकता व अखंडता महत्त्वाची...

१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा देश टिकू शकणार नाही, असं अनेक लोकांनी म्हटलं होतं. परंतु गेल्या ७५ वर्षांपासून भारत अखंड असल्याचं मोदी म्हणाले, याशिवाय या काळात भारतानं अनेक क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे.

कोरोना काळात लसीकरणाचा विक्रम...

जेव्हा संपूर्ण जगभरात कोरोना महामारीनं थैमान घातलेलं होतं, त्यावेळी भारतानं कोरोनाकाळात विक्रमी लसीकरण केलं, ती लसीकरणाची मोहीम जगातील सर्वात मोठी होती, असं पंतप्रधान म्हणाले.

आत्मनिर्भर भारत हा अजेंडा नाही तर जनआंदोलन...

माझं एक स्वप्न आहे, की जगाला ज्या वस्तूची किंवा गोष्टीची आवश्यकता आहे, त्याचं निर्माण भारतानं करायला हवं, त्यामुळं मी खाजगी क्षेत्रातल्या लोकांनाही आवाहन करत आहे की त्यांनी या अभियानात सहभागी व्हावं, याशिवाय आज घरातली लहान मुलंही देशाबाहेर तयार झालेल्या खेळण्यांशी खेळण्यास नकार देतात, त्यामुळं आत्मनिर्भर भारत हा अजेंडा नाही तर जनआंदोलन झाल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

७५ व्या स्वातंत्र्यदिनी PM मोदींचे पाच संकल्प...

  • १. भारताला विकसित राष्ट्र म्हणून उदयास आणणं
  • २. गुलामीचा अंश मिटवणं
  • ३. भारताच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणं
  • ४. देशाची एकता आणि अखंडता महत्त्वाची
  • ५. देशाच्या नागरिकांकडून त्यांच्या कर्तव्यांचं पालन

असे पाच संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी घेतले आहे. याशिवाय त्यांनी शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, रिक्षाचालक आणि लघु उद्योगदारांना हे समाजाचा मोठा भाग असून या लोकांचं सामर्थ्यवान होणं प्रचंड गरजेचं असल्याचं मोदींनी राष्ट्राला संबोधित करताना म्हटलं आहे.

IPL_Entry_Point