jackie shroff In High Court : बॉलिवूडचा स्टार आणि ज्येष्ठ अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा 'भिडू' हा डायलॉग खूप प्रसिद्ध आहे. जॅकी श्रॉफ त्यांच्या बोलण्यात हा शब्द अनेकदा वापरतात. अनेक जण एकमेकांना संबोधतांना हा शब्द त्यांच्या बोलण्यात अनेक वेळा वापरत असतात. मात्र हा शब्द वापरण्यासंदर्भात जॅकी श्रॉफने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जॅकी श्रॉफने कोर्टात सादर केलेल्या याचिकेत त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव, फोटो त्याचा आवाज व त्यांचा प्रसिद्ध व आवडता शब्द 'भिडू' वापरू नये, अशी मागणी त्याने न्यायालयात केली आहे. त्याच्या वैयक्तिक व कॉपी राइट अधिकारांचे कोर्टाने रक्षण करावे अशी, मागणी देखील त्याने कोर्टात केली आहे.
जॅकी श्रॉफ याने दिल्ली हायकोर्टात सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप्स आणि इतर प्लॅटफॉर्मवर त्याच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, त्याचा आवाज, त्याचे फोटो व त्याच्याशी संबंधित इतर गोष्टींचा वापर करू नये, असे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी त्याने केली आहे. त्याचा आवडता शब्द भिडू हा देखील त्याच्या परवानगी शिवाय कुणी वापरू नये असे त्याने म्हटले आहे. न्यायमूर्ती संजीव नरुला यांनी या याचिकेवर न्यायालयात सुनावणी केली असून त्यासोबत त्यांनी बचाव पक्षालाही नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणावर १५ मे रोजी सुनावणी होणार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
जॅकी श्रॉफच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले त्याचे वकील प्रवीण आनंद यांनी न्यायालयाला युक्तिवाद करतांना सांगितले की, काही प्रकरणांमध्ये त्यांचे फोटो, आवाज हा काही आक्षेपार्ह मीम्समध्ये वापरला गेला आहे. तर काही घटनात जॅकी श्रॉफच्या फोटोचा वापर हा पोर्नोग्राफीमध्ये देखील होत आहे. यामुळे जॅकी श्रॉफची विनाकारण बदनामी होत आहे. त्यामुळे त्याने याचिकेत न्यायालयाला विनंती केली आहे की, जॅकी श्रॉफ या नावाव्यतिरिक्त त्यांना जॅकी, जग्गू दादा आणि भिडू या नावानेही संबोधले जाते. त्यामुळे ही सर्व नावे वापरण्या आधी त्याची परवानगी घ्यावी असे म्हटले आहे.
जॅकी श्रॉफ यांनी त्याच्या याचिकेत गुगलच्या मालकीच्या टेनॉर, GIF बनवणारी कंपनी Giphy, Al प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला आहे. जॅकी श्रॉफने म्हटले आहे की त्याचा आवाज, त्याचा फोटो किंवा नाव वापरल्याने त्याच्या प्रतिमा डागाळली जात आहे.