Manipur Violence : मणिपूर पुन्हा हादरलं, सैन्यातील जवानाची अपहरण करून हत्या
Manipur Violence : काही दिवसांपूर्वीच जमावाकडून भारतीय सैन्यातील जवानाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्याचा मृतदेह आढळून आला आहे.
Manipur Violence News Updates : आरक्षणाच्या प्रश्नावरून ईशान्येकडील मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू आहे. संपूर्ण राज्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थिती नियंत्रणात असली तरी अनेक ठिकाणी गोळीबार आणि हत्येच्या घटना घडत आहे. त्यातच आता जमावाने भारतीय सैन्यातील एका जवानाची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात संबंधित जवानाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळं आता या घटनेवरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सीपॉय सेर्तो थांगथाँग कोम असं मृत जवानाचं नाव असून त्याच्या हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, मणिपुरची राजधानी इंफाळमध्ये राहणारे भारतीय सैन्याचे जवान सीपॉय सेर्तो थांगथाँग कोम यांचं काही दिवसांपूर्वी जमावाकडून अपहरण करण्यात आलं होतं. सुट्टीनिमित्त ते घरी आले असता काही लोकांनी त्यांना घरातून उचललं होतं. लिमाखोंग लष्करी स्टेशनवरून परतल्यानंतर त्यांच्या मुलासमोर आरोपींनी त्यांना गाडीत घालून अज्ञातस्थळी नेलं होतं. परंतु रविवारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपींच्या अटेकची कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
गेल्या १६ सप्टेंबरला सीपॉय कोम हे सुट्टीवर गेले होते. घरी आल्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांचा १० वर्षीय मुलगा या घटनेचा साक्षीदार असल्याची माहिती संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय वडिलांसोबत काम करत असताना काही लोक अचानक घरात घुसले. त्यानंतर आरोपींनी डोक्याला बंदूक लावून पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसवून नेल्याचं मृत जवानाच्या १० वर्षीय मुलाने पोलिसांना सांगितलं आहे. सोगोलमंग पोलिसांनी सीपॉय कोम यांचा मृतदेह खुनींगथेक परिसरातून ताब्यात घेण्यात आला आहे. त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती मणिपूर पोलिसांकडून देण्यात आली आहे.