मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  K Sai Charan : भारतीय विद्यार्थ्यावर अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; शिकागो पोलीस घटनास्थळी दाखल

K Sai Charan : भारतीय विद्यार्थ्यावर अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार; शिकागो पोलीस घटनास्थळी दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 24, 2023 05:47 PM IST

Firing On Indian Student In Chicago : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याला लुटण्याचा प्रयत्न करत त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Firing On Indian Student In America
Firing On Indian Student In America (HT)

Firing On Indian Student In America : चीनी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमलेल्या दक्षिण आशियाई लोकांवर गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता अमेरिकेत एका भारतीय विद्यार्थ्यावर तुफान गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शिकागोतील एका दुकानात सामान आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला आरोपींनी लुटण्याचा प्रयत्न करत त्याच्या ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं आता या घटनेमुळं अमेरिकेसह भारतात खळबळ उडाली असून शिकागो पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. के साईचरण असं गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणातील के साईचरण नावाचा तरुण काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील शिकागोत एमएसचं शिक्षण घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी तिथं त्याची काही भारतीय विद्यार्थ्यांसोबत मैत्री झाली होती. के साईचरण आपल्या मित्रांसोबत शिकागोतील एका दुकानात सामान आणण्यासाठी जात असताना त्याच्यावर अज्ञात आरोपींनी अचानक हल्ला चढवला. त्याला लुटण्याचा प्रयत्न करत आरोपींनी के साईचरणवर तुफान गोळीबार केला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या गोळीबारात साईचरणला गोळी लागली असून त्याच्या मित्रांनी त्याला उपचारासाठी तातडीनं नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

गोळीबाराच्या घटनेनंतर आता शिकागो पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून साईचरणचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. के साईचरण हा काही आठवड्यांपूर्वीच भारतातून अमेरिकेत गेला होता. आता त्याच्यावर गोळीबार झाल्याची घटना आम्हाला माध्यमातून समजल्यानं आम्हाला मानसिक धक्का बसला असून त्याच्या आईला प्रचंड दुख: झाल्याचं त्याचे वडील श्रीनिवास यांनी सांगितलं आहे.

WhatsApp channel