हरयाणात सुपडा साफ झालेल्या आम आदमी पक्षाचा जम्मू-काश्मीरमध्ये बोलबाला, एक जागा जिंकली!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हरयाणात सुपडा साफ झालेल्या आम आदमी पक्षाचा जम्मू-काश्मीरमध्ये बोलबाला, एक जागा जिंकली!

हरयाणात सुपडा साफ झालेल्या आम आदमी पक्षाचा जम्मू-काश्मीरमध्ये बोलबाला, एक जागा जिंकली!

Oct 08, 2024 03:26 PM IST

Jammu Kashmir Election Results : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं अनपेक्षित विजय मिळवला आहे. मेहराज मलिक यांनी एक जागा जिंकली आहे.

हरयाणात सुपडा साफ झालेल्या आम आदमी पक्षाचा जम्मू-काश्मीरमध्ये शिरकाव, एक जागा जिंकली!
हरयाणात सुपडा साफ झालेल्या आम आदमी पक्षाचा जम्मू-काश्मीरमध्ये शिरकाव, एक जागा जिंकली! (PTI)

Aam Aadmi Party in Jammu Kashmir : दिल्लीला लागून असलेल्या हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत किंचितही प्रभाव पाडू न शकलेल्या आम आदमी पक्षाला (AAP) जम्मू-काश्मीरमध्ये अनपेक्षित दिलासा मिळाला आहे. 'आप'नं जम्मू-काश्मीर विधानसभेची एक जागा जिंकत या राज्याच्या राजकारणात शिरकाव केला आहे.

आम आदमी पक्षानं (AAP) डोडा विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला आहे. इथून 'आप'चे उमेदवार मेहराज मलिक यांनी निवडणूक लढविली होती. त्यांच्यासमोर भाजपचे गजयसिंह राणा यांच्यासह काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सच्या उमेदवारांचं आव्हान होतं. ते आव्हान परतावून लावत मलिक यांनी बाजी मारली. त्यांच्या रूपानं आम आदमी पक्षाला जम्मू-काश्मीरमध्ये पहिला आमदार मिळाला आहे.

कोण आहेत मेहराज मलिक?

मेहराज मलिक हे प्रदीर्घ काळापासून आम आदमी पक्षाशी संबंधित आहेत. ते डोडा भागातील लोकप्रिय नेते मानले जातात. मलिक यांनी गेल्या काही वर्षांत डोडामध्ये चांगला जम बसवला होता. ३६ वर्षीय मलिक यांनी २०२१ मध्ये डीडीसी निवडणुकीत विजय मिळवला होता. जम्मू-काश्मीरमध्ये 'आप'चे निवडून आलेले ते एकमेव लोकप्रतिनिधी होते. मेहराज मलिक यांनी पीजीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या जाहीर सभेला प्रचंड मोठी गर्दी झाली होती. त्यामुळं ते प्रकाशझोतात आले. या जाहीर सभेत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह देखील सहभागी झाले होते.

स्पष्टवक्ते नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलिक यांनी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या तोडीस तोड प्रचार केला होता. डीडीसीचे सदस्य म्हणून नायब राज्यपालांच्या अखत्यारीतील प्रशासनावर ते जोरदार टीका करायचे. त्यामुळं लोकांमध्ये लोकप्रिय होते. मलिक यांनी आपल्या डोंगराळ भागातील जनतेला मुलभूत सुविधा देण्याचं आश्वासन देऊन मते मागितली होती. जनतेनं त्यांच्यावर विश्वास दाखवल्याचं निकालातून दिसत आहे.

निकालाची स्थिती काय?

राष्ट्रपती राजवटीनंतर विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या काश्मिरी जनतेनं काँग्रेस व नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीला कौल दिला आहे. भाजपची इथं पीछेहाट झाली आहे. तर, राज्यातील एक प्रमुख पक्ष असलेल्या पीडीपीचा दारुण पराभव झाला आहे. इतरांनी ९ जागांवर आघाडी घेतली आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर