मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Delhi Assembly : नोटांची बंडलं काढत आमदाराचा उपराज्यपालांवर गंभीर आरोप; दिल्ली विधानसभेत जोरदार राडा

Delhi Assembly : नोटांची बंडलं काढत आमदाराचा उपराज्यपालांवर गंभीर आरोप; दिल्ली विधानसभेत जोरदार राडा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 18, 2023 03:46 PM IST

Delhi Assembly News Update : आम्हाला पैसे देऊन खरेदी केलं जात असल्याचा आरोप करत आपच्या आमदारानं थेट विधानसभेतच नोटांचं बंडल काढल्यामुळं सभागृहात एकच खळबळ उडाली.

Delhi Assembly News Update
Delhi Assembly News Update (HT)

Delhi Assembly News Update : आमदारांच्या फोडाफोडीच्या प्रकरणांवरून आज दिल्ली विधानसभेत मोठा गदरोळ झाल्याचं पाहायला मिळालं. आम आदमी पार्टीच्या आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत आपचे आमदार मोहिंदर गोयल यांनी थेट सभागृहातच नोटांची बंडलं काढली. याशिवाय आमदारांना पक्ष बदलण्यासाठी पैसे दिले जात असल्याची माहिती उपराज्यपालांनाही असल्याचा आरोपी आपच्या आमदारांनी केल्यानंतर आता यावरून सभागृहात सत्ताधारी आप आणि विरोधक भाजपमध्ये जोरदार संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्ली विधानसभेचं कामकाज सुरू असतानाच आम आदमी पार्टीचे आमदार मोहिंदर गोयल यांनी खिशातून नोटांची बंडलं काढत भाजपसह उपराज्यपालांवर जोरदार हल्लाबोल केला. रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेवर ठेवण्यासाठी ३० ते ४० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला. या प्रकरणाची तक्रार उपराज्यपाल आणि पोलीस आयुक्तांकडे केली असता त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं गोयल विधानसभेत म्हणाले. त्यानंतर त्यांनी थेट खिशातील नोटांची बंडलं काढत विधानसभाध्यक्षांना दाखवलं. है पैसे लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोपही गोयल यांनी केला आहे.

आरोपी कंत्राटदारांविरोधात मी भूमिका घेत असल्यामुळं मला लाच देण्यात आली आहे, असं सांगत गोयल यांनी खिशातील नोटांची बंडलं काढून विधानसभाध्यक्ष आणि सभागृहातील मंत्री आणि आमदारांना दाखवली. दिल्लीतील अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांविषयीची माहिती उपराज्यपालांना असूनही ते त्यावर कोणतीही कार्यवाही करत नाहीये. मी कंत्राटदारांविरोधात भूमिका घेऊन त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असल्यामुळं आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत गोयल यांनी प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

IPL_Entry_Point