लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचा अंदाजापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवला आहे. इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांची आज दिल्लीत बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेत इंडिया आघाडीचे २९५ पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असा अंदाज व्यक्त केला होता. तर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) जागा बहुमताच्या आकड्यापेक्षा कमी होतील, असा अंदाज खर्गे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘सत्ताधारी भाजपला केवळ २२० जागा मिळतील. ते सत्तेतून बाहेर फेकले जातील. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळून एकूण २३५ जागा मिळतील’, असं केजरीवाल म्हणाले. ‘इंडिया आघाडीला २९५+ जागा मिळतील. भाजपला २२० तर एनडीए आघाडीला २३५ जागा मिळतील. ’इंडिया' आघाडी स्वबळावर मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन करेल.' असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. ‘इंडिया’ आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ४ जूननंतर निश्चित करण्यात येईल, असंही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते सय्यद नासीर हुसेन म्हणाले, 'लोकसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या २७२ पेक्षा जास्त जागा एकट्या काँग्रेस पक्षाला मिळतील. इंडिया आघाडीला २७२ पेक्षा जास्त जागा मिळणार आहे. आम्ही सरकार स्थापन करत आहोत. इंडिया आघाडीतील नेते एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नासीर हुसेन म्हणाले.
भाकपचे सरचिटणीस डी. राजा यांनी बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली. ‘इंडिया आघाडीचे नेते उद्या, रविवारी निवडणूक आयोगाची भेट घेणार आहे. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान अत्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे, असा निर्णय ’इंडिया' आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मतमोजणी एजंटांना सावध राहण्याविषयी सांगणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने उद्या वेळ दिल्यानंतर आमचे नेते आयोगाच्या अधिकाऱ्यांना भेटतील. निवडणुकीचा निकाल एकतर्फी होणार आहे. आम्ही २९५+ जागा जिंकू.' असा विश्वास डी. राजा यांनी व्यक्त केला.
दरम्यान , शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल देसाई यांनी महाराष्ट्रात महाराष्ट्र विकास आघाडी ३० ते ३५ जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला. तर भाजपची ४०० जागा जिंकण्याची योजना लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच कोलमडल्याचा दावा राजद नेते, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. ‘आम्हाला २९५+ जागा मिळतील. देशात इंडिया आघाडी जिंकत आहे. पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याबाबत आम्ही नंतर निर्णय घेणार आहे. भाजपचा '४०० पार' हा चित्रपट पहिल्याच टप्प्यात फ्लॉप ठरला आहे, असं यादव यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
संबंधित बातम्या