Jalandhar Punjab Lok Sabha Bypoll : कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने शंभराहून अधिक जागांवर विजय मिळवत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. तसेच उत्तर प्रदेशातील महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. त्यानंतर आता पंजाबमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने मोठ्या मताधिक्याने बाजी मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं काँग्रेस आणि भाजपाला पंजाबमध्ये मोठा धक्का बसला आहे. जालंधर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत आपचे उमेदवार सुशील रिंकु यांचा विजय झाला आहे. त्यामुळं यंदाच्या लोकसभेत आपचा पहिलाच खासदार निवडून जाणार आहे.
भारत जोडो यात्रेवेळी काँग्रेसचे खासदार संतोख सिंह चौधरी यांचं निधन झालं होतं. परिणामी जालंधर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली होती. काँग्रेसने संतोख सिंह यांची पत्नी करमजीत कौर यांना तर आपने सुशील रिंकु यांना रिंगणात उतरवलं होतं. याशिवाय भाजपनेही दिग्गज नेते इंदर इक्बाल सिंह यांना उमेदवारी देत पोटनिवडणुकीत चुरस वाढवली होती. त्यानंतर आता या निवडणुकीचा निकाल लागला असून आपचे उमेदवार सुशील रिंकु यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री भगवंत मान आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केल्यामुळंच रिंकु यांचा विजय झाल्याचं बोललं जात आहे.
Karnataka Election Results : काँग्रेसचे विजयी आमदारांचा आकडा शंभरीपार, भाजपला पन्नाशी गाठता येईना!
ओडिशातील एका विधानसभेच्या जागेवर बिजू जनता दलाने विजय मिळवला आहे. तर उत्तर प्रदेशातील दोन्ही विधानसभांच्या जागांवर अपना दलाचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळं आता पंजाब, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातील निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकात काँग्रेसने ११७ तर भाजपने ५३ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळं आता भाजपाच्या कर्नाटकातील पराभवाची देशभर चर्चा होत आहे.