arvind kejriwal on alliance with congress : ‘आम आदमी पक्षानं भारतीय जनता पक्षाच्या पराभवासाठी, भाजपची गुंडगिरी व हुकूमशाही संपवण्यासाठी काँग्रेसशी युती केली आहे. ही युती कायमची नाही. आम्ही लग्न केलेलं नाही,’ असं विधान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच त्यांनी हे वक्तव्य केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.
‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत केजरीवाल यांनी काँग्रेससोबतच्या आघाडीवर भाष्य केलं. ‘येत्या ४ तारखेला देशाला मोठं सरप्राईज मिळेल. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांची आघाडी इंडिया जिंकेल, असा दावा त्यांनी यावेळी केला.
'देश वाचवणं गरजेचं आहे. जिथं जिथं भाजपला पराभूत करण्यासाठी युतीची गरज होती, तिथं ‘आप’नं काँग्रेससोबत युती करून एकच उमेदवार उभा केला. पंजाबमध्ये भाजपचं अस्तित्व नाही. त्यामुळं तिथं काँग्रेसशी युती झालेली नाही, असंही केजरीवाल यांनी सांगितलं.
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. ते सध्या जामिनावर आहेत. या प्रकरणावरही त्यांनी भाष्य केलं. 'माझं पुन्हा तुरुंगात जाणं हा मुद्दा नाही. या देशाचं भवितव्य पणाला लागलं आहे. त्यांना पाहिजे तोपर्यंत मला तुरुंगात ठेवू द्या, मी घाबरणार नाही. मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी भाजपची इच्छा आहे, पण याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ते म्हणाले. भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आल्यास विरोधी पक्षातील सर्व प्रमुख नेते तुरुंगात असतील, असं सांगताना, त्यांनी रशियातील व्लादिमिर पुतीन यांच्या राजवटीचं उदाहरण दिलं.
नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहा हेच पंतप्रधान होतील. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास योगीचं मुख्यमंत्रिपद जाईल, असं अरविंद केजरीवाल म्हणाले होते. त्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. 'योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल मी जे बोललो होतो, त्यावर मी आजही ठाम आहे. पंतप्रधान मोदी जिंकले तर योगी आदित्यनाथ यांचं भवितव्य अंधारात असेल, असं ते म्हणाले. भाजपनं माझं म्हणणं खोडून काढावं असं आव्हानही त्यांनी दिलं.
संबंधित बातम्या