Sanjay Singh Renominated by AAP : आम आदमी पक्ष व पक्षाच्या नेत्याच्या मागे सक्तवसुली संचालनालयाचा (ED) ससेमिरा लागला असतानाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल लढण्याच्या मूडमध्ये आहेत. कथित दारू घोटाळ्यात तुरुंगात असलेले ज्येष्ठ नेते संजय सिंह यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्याची तयारी आम आदमी पक्षानं केली आहे. भाजपच्या दबावाच्या राजकारणाला हे सणसणीत उत्तर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
२०१८ मध्ये ते दिल्लीतून राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या काळापासून अरविंद केजरीवाल यांचे साथीदार असलेले संजय सिंह यांचा पक्षात मोठा दबदबा आहे. ते राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या संसदीय पक्षाचे नेतेही आहेत.
संजय सिंह यांना सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) गेल्या वर्षी ४ ऑक्टोबर रोजी कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. ८ दिवस ईडीच्या कोठडीत राहिल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून ते तिहार तुरुंगात आहेत. त्यांनी आता जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी ट्रायल कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
संजय सिंह यांच्या अटकेनंतर ईडीनं केजरीवाल यांना समन्स पाठवणं सुरू केलं आहे. मात्र, केजरीवाल यांनी ईडीच्या तीन समन्सना केराची टोपली दाखवली आहे. भारतीय जनता पक्ष राजकीय सूडापोटी हे सगळं करत असल्याचा केजरीवाल यांचा आरोप आहे. या दबावाला अजिबात भीक घालायची नाही, असा निर्धार जणू केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळंच त्यांनी तुरुंगात असलेल्या संजय सिंह यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
संजय सिंह यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्जावर सही करण्याची परवानगी मिळावी यासाठी आम आदमी पक्षानं दिल्लीतील न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयानं त्यांना उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली आहे. संजय सिंह यांची राज्यसभेची मुदत २७ जानेवारी रोजी संपत आहे.
संबंधित बातम्या