AAP news : ७० हजार कोटीवाले अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हा कुठे होतात?; अण्णा हजारेंना आम आदमी पक्षाचा बोचरा सवाल
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  AAP news : ७० हजार कोटीवाले अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हा कुठे होतात?; अण्णा हजारेंना आम आदमी पक्षाचा बोचरा सवाल

AAP news : ७० हजार कोटीवाले अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हा कुठे होतात?; अण्णा हजारेंना आम आदमी पक्षाचा बोचरा सवाल

Updated Mar 22, 2024 07:18 PM IST

AAP Reply to Anna Hazare : अरविंद केजरीवालांच्या अटकेला ‘कर्माचं फळ’ म्हणणाऱ्या अण्णा हजारे यांना आम आदमी पक्षानं सडेतोड उत्तर दिलं आहे.

७० हजार कोटीवाले अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हा कुठे होतात?; अण्णा हजारेंना बोचरा सवाल
७० हजार कोटीवाले अजित पवार भाजपसोबत गेले तेव्हा कुठे होतात?; अण्णा हजारेंना बोचरा सवाल

AAP Reply to Anna Hazare : अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक हे त्यांच्या कर्माचं फळ आहे, अशी प्रतिक्रिया देणारे समाजसेवक अण्णा हजारे यांना आम आदमी पक्षानं सणसणीत उत्तर दिलं आहे. ‘देशातील तमाम घोटाळेबाज जेव्हा भाजपमध्ये गेले, तेव्हा हे आदरणीय कुठं होते? तेव्हा त्यांच्या मुखारविंदातून एकही शब्द कसा आला नाही,’ असा खोचक सवाल आम आदमी पक्षानं केला आहे.

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात ईडीनं (ED) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे मार्गदर्शक अण्णा हजारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केजरीवालांवर टीका केली होती. 'हा माणूस माझ्यासोबत असताना दारूच्या विरोधात लढत होता, तोच दारूसाठी धोरणं आखू लागला. त्याची अटक हा कृतीचा परिणाम आहे, असं हजारे म्हणाले होते.

आम आदमी पक्षाचे आमदार दिलीप पांडे यांना अण्णांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारलं असता त्यांनी तितकंच सडेतोड उत्तर दिलं. पांडे यांनी प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे यांचं नाव घेणं टाळलं. केवळ 'आदरणीय' असं म्हणत त्यांच्या दुटप्पी वर्तनावर बोट ठेवलं.

आदरणीय त्यावर का बोलत नाहीत?

‘ते आमचे आदरणीय आहेत. त्यांचं वक्तव्य दुर्दैवी आहे. त्यांचं वर्तन पाहून आम्हाला प्रचंड वेदना होतात. चिंता वाटते. हिंमता बिस्व सरमा यांच्याविरोधात भाजपचे लोक पाणी घोटाळ्याची मोहीम चालवतात, तोच माणूस भाजपमध्ये सहभागी होतो आणि पुढं जाऊन मुख्यमंत्री होतो, तेव्हा त्यांच्या विरोधात कुणी आवाज उठवत नाही. अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप होतात आणि ते नंतर भाजपसोबत जातात. तेव्हा आदरणीयांच्या मुखातून आवाज निघत नाही. आदरणीयांचं हे वागणं अत्यंत दु:खद आहे,’ अशी जळजळीत टीका दिलीप पांडे यांनी केली.

जनता सगळ्यांचा हिशेब करेल!

'भाजप ज्यांच्या विरोधात होता, आरोप करत होता, तेच लोक जेव्हा भाजपमध्ये जातात, तेव्हा हे सगळे आदरणीय कुठं जातात कळत नाही. याउलट जो व्यक्ती विकासाचं राजकारण करतो. देशाला नंबर एक बनवण्याचं स्वप्न पाहतो, त्याला अटक होते तेव्हा हेच लोक लगेच निराधार, कुठलाही शेंडा-बुडका नसलेली विधानं करण्यासाठी पुढं येतात. कोण काय करतोय हे संपूर्ण देश बघत आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानातून जनता या सगळ्याचा हिशेब करील, असा विश्वास दिलीप पांडे यांनी व्यक्त केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर