Aadhar card : आधार कार्ड महत्वाचं डॉक्युमेंट आहे. अनेक ठिकाणी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. आधार हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे दिले जाते. आधार हा महत्वाचा पत्त्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात आहे. दर १० वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे सरकारने अनिवार्य केलं आहे. त्यानुसार सध्या आधार अपडेट करण्याची प्रणाली सुरू आहे. ऑनलाइन पद्धतीने हे कार्ड अपडेट करता येत आहे. १४ सप्टेंबर पर्यंत आधारकार्ड अपडेट करता येणार असल्यानं लवकरात लवकर नागरिकांनी त्यांचे आधारकार्ड अपडेट करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या नागरिकांनी १० वर्षांपूर्वी आधार कार्ड काढले आहेत त्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. या साठी नागरिकांना मुदत देखील देण्यात आली आहे. या मुदतीपूर्वी मोफत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, भारत सरकार आधार कार्ड धारकांना १४ सप्टेंबरपर्यंत त्यांची माहिती विनामूल्य अपडेट करून देण्यात येणार आहे. आधार अपडेट करण्याची मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली आहे. असे असतांना नागरिकांनी त्यांची आधार माहिती ही अद्याप अपडेट केलेली नाही.
ही मुदत अनेक वेळा वाढवण्यात आली असली तरी UIDAI ती आणखी वाढवणार की नाही याबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे जर तुमच्याकडे १० वर्षांहून अधिक काळ असलेले आधार कार्ड असल्यास व ते तेव्हापासून अपडेट केलेले नसल्यास, तुम्ही ५० रुपयांचे शुल्क टाळू शकता आणि तुमचे कार्ड विनामूल्य कसे अपडेट करू शकता याची माहिती आपण घेणार आहोत.
१. तुमचा आवडीचे ब्राउझर उघडा आणि त्यावर https://myaadhaar.uidai.gov.in हे संकेतस्थळ टाका
२. दिसत असलेल्या पेजवर तुमचा आधार कार्ड क्रमांक प्रविष्ट करा आणि कार्डशी लिंक केलेल्या फोन नंबरवर पाठवलेला वन-टाइम पासवर्ड (OTP) टाइप करा.
३. पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर, तुमचे सध्याचे आणि कार्डावर असलेली ओळख, माहिती व पत्त्याचे तपशील बरोबर आहेत का ते तपासा.
४. जर तुम्हाला तुमचा पत्ता किंवा नंबर अपडेट करायचा असेल तर, ड्रॉप-डाउन मेनूमधून तुम्ही सबमिट करू इच्छित कागदपत्रे निवडा आणि तुम्हाला हव्या असलेल्या फाइल अपलोड करा.
५. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमच्या अपडेट माहिती पुन्हा तपासून घ्या यांनी त्यानंतर सबमिट करा. यानंतर तुम्हाला सेवा विनंती क्रमांक (SRN) मिळेल, ज्याचा वापर तुम्ही आधार अपडेट करण्याच्या प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी करू शकता.
लक्षात ठेवा की या फाइल्सचा आकार २ एमबी पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सपोर्ट फाइल फॉरमॅटमध्ये जेपीईजी आणि पीएनजी किंवा पीडीएफ फाइल समाविष्ट करू शकता. तसेच, ऑनलाइन पोर्टलचा वापर केवळ त्यांच्या ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा अपडेट करण्यासाठी केला जाऊ शकतो. याचा अर्थ ज्या वापरकर्त्यांना बायोमेट्रिक्स, नाव, छायाचित्र आणि मोबाईल नंबर यासारख्या इतर गोष्टी अपडेट करायच्या आहेत त्यांना त्यांच्या जवळच्या UIDAI अधिकृत केंद्राला भेट द्यावी लागेल.